Maharashtra New Expressway : मुंबई शहरासह उपनगरात गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. दरम्यान, हीच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपाययोजना देखील केल्या जात आहेत.
अशातच, आता ठाणे ते वसई दरम्यान चा प्रवास सुपरफास्ट व्हावा यासाठी एम एम आर डी ए ने भुयारी मार्ग आणि उन्नत रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
या दोन प्रकल्पांमुळे ठाणे ते वसई हा प्रवास जलद होणार आहे. खरे तर, सध्या स्थितीला ठाणे ते वसई असा प्रवास करायचा म्हटलं तर लोकल हा सर्वात उत्तम पर्याय आहे.
पण लोकलच्या प्रवासातही अनेकदा प्रवाशांना अधिकचा वेळ खर्च करावा लागतो. शिवाय लोकलमध्ये असणारी तोबा गर्दी प्रवाशांच्या अडचणीत भर घालत असते.
जर समजा एखाद्याने रस्ते मार्गाने प्रवास करण्याचा निर्णय घेतला तर फाउंटन हॉटेल जवळ मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यामुळे या ठिकाणी प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. येथे होणाऱ्या वाहनांच्या गर्दीमुळे प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाया जातो.
अर्थातच ठाणे ते वसईचा लोकल प्रवास असो किंवा रस्ते मार्गाचा प्रवास असो दोन्हीही पर्याय प्रवाशांसाठी अनुकूल नाहीयेत. यामुळे सध्या ठाणे ते वसई हा प्रवास खूपच आव्हानात्मक बनला आहे. नजीकच्या काळात मात्र हा प्रवास खूपच जलद होणार आहे.
कारण की मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून ठाणे, वसई, विरार, मीरा, भाईंदर हा प्रवास वेगवान व्हावा या अनुषंगाने वसई, फाऊंटन हॉटेल नाका ते गायमुख, ठाणे असा बोगदा विकसित केला जाणार आहे.
हा बोगदा 5.5 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. या बोगद्यामुळे वसई ते ठाणे प्रवास जलद होईल अशी आशा आहे. तसेच फाऊंटन हॉटेल ते भाईंदर असा उन्नत रस्ता देखील तयार करणे प्रस्तावित आहे.
हा उन्नत रस्ता दहा किलोमीटर लांबीचा राहील अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान या दोन्ही प्रस्तावाला मंगळवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.
या दोन्ही प्रकल्पांसाठी अंदाजे वीस हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या वीस हजार कोटी रुपयांच्या खर्चामुळे ठाणे ते वसई हा प्रवास मात्र गतिमान होणार आहे. यामुळे येथील नागरिकांना नक्कीच दिलासा मिळेल अशी आशा आहे.