7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना नुकतीच महागाई भत्त्याची भेट मिळाली आहे. या सरकारी नोकरदार मंडळीचा महागाई भत्ता 50 टक्क्यांवर पोहोचला आहे. जानेवारी 2024 पासून ही महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आली आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच मोदी सरकारने महागाई भत्ता वाढ लागू करून सरकारी कर्मचाऱ्यांना साधण्याचा प्रयत्न केला आहे.
विशेष म्हणजे याचा लाभ मार्च महिन्याच्या वेतना सोबत मिळणार आहे. म्हणजे कर्मचाऱ्यांच्या हातात एप्रिल महिन्यांचे वेतन मिळेल त्या वेतना सोबत याचा लाभ दिला जाणार आहे.
मात्र असे असले तरी अजूनही सरकारी कर्मचाऱ्यांच्या काही प्रलंबित मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. कोरोनाच्या काळातली महागाई भत्ता थकबाकीची रक्कम देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली नाही.
खरेतर, अर्थसंकल्पीय अधिवेशनात या मुद्द्यावर चर्चा होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, सरकारने या प्रकरणात अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोणतीच चर्चा केली नाही. सरकार सातत्याने कोरोना काळातील महागाई भत्ता थकबाकी देण्यास इन्कार करत आहे.
भारतीय रक्षक मजदूर संघाचे सरचिटणीस मुकेश सिंह यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून या समस्येकडे लक्ष देण्याची विनंती केली होती.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंत थांबवण्यात आला होता. तथापि, जुलै 2021 पासून महागाई भत्त्यात एकाच वेळी वाढविण्यात आला आहे.
परंतु, केंद्रीय कर्मचाऱ्यांना रोखलेल्या कालावधीसाठीचा महागाई भत्ता थकबाकीचे पैसे मिळाले नाहीत. हेच कारण आहे की, गेल्या अनेक दिवसांपासून कर्मचारी 18 महिन्यांच्या डीए थकबाकीची मागणी करत आहेत.
निवृत्ती वेतनधारकांनीही थकबाकीबाबत पंतप्रधान मोदी यांच्याकडे दाद मागितली आहे. पण कोरोना काळातील दीड वर्षाची महागाई भत्ता थकबाकी देणे बाबत सरकारने नेहमीच नकार दिला आहे.
मात्र, कोरोना काळातली ही महागाई भत्ता थकबाकी केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच मिळू शकते अशी आशा आहे. सध्या संपूर्ण देशभरात आचारसंहिता लागू झाली आहे. लोकसभा निवडणुका झाल्यानंतर जून महिन्यात त्याचा निकाल लागणार आहे.
यामुळे निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जे नवीन सरकार सत्तेत येईल ते कोरोना काळातील महागाई भत्ता थकबाकी देणे बाबत सकारात्मक निर्णय घेईल असे बोलले जात आहे. त्यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना कोरोना काळातील डीए एरियरची रक्कम मिळते का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.