7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर, नुकत्याच काही महिन्यांपूर्वी केंद्रातील सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला. मार्च 2024 मध्ये केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला.
आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात होता. या निर्णयानंतर, महागाई भत्ता 50% एवढा झाला. याबाबतचा निर्णय मार्च महिन्यातचं झाला असला तरी देखील जानेवारी महिन्यापासूनच महागाई भत्ता वाढ लागू झाली आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढ दिली जाते. यानुसार जानेवारी महिन्यापासूनची महागाई भत्ता वाढ मिळाली आहे. तसेच जुलै महिन्यापासूनच्या महागाई भत्ता वाढी संदर्भात सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात निर्णय घेतला जाणार आहे.
महागाई भत्ता हा एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार ठरत असतो. जानेवारी ते जून 2024 या कालावधी मधील एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार जुलै महिन्यापासून किती महागाई भत्ता वाढणार ? हे ठरणार आहे.
ही संपूर्ण आकडेवारी जुलै महिन्याच्या शेवटी जाहीर होईल आणि त्यावेळी जुलै महिन्यापासून महागाई भत्ता किती वाढणार हे कळणार आहे. तत्पूर्व मात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे महागाई भत्ता 50% झाला असल्याने आता इतरही तेरा प्रकारचे भत्ते वाढवले जाणार आहेत.
यामध्ये घर भाडे भत्त्याचा देखील समावेश आहे.दरम्यान, आता आपण महागाई भत्ता 50% झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचे कोणकोणते भत्ते वाढवलेले जाणार आहेत आणि यामध्ये नेमकी किती वाढ झाली आहे हे जाणून घेणार आहोत.
कोणते भत्ते वाढणार ?
महागाई भत्ता 50% झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचे तेरा प्रकारचे भत्ते वाढणार आहेत. यासंदर्भात सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने एक परिपत्रक काढले आहे.
या परिपत्रकात वाहन भत्ता, दिव्यांग मुलांसाठी विशेष भत्ता, मुलांसाठी भत्ता, शैक्षणिक भत्ता, घर भाडे भत्ता, ड्रेस भत्ता, कर्तव्य भत्ता आणि प्रतिनियुक्ती भत्ता वाढवला जाणार असे म्हटले गेले आहे. या भत्यामध्ये 25 टक्क्यांची वाढ होणार आहे. तसेच ही वाढ एक जानेवारी 2024 पासून लागू राहणार आहे.