7th Pay Commission : सध्या भारतात नवरात्र उत्सवाची धूम सुरू आहे. नवरात्र उत्सवामुळे देशात सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दांडिया, गरबा, सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे नवरात्र उत्सवात मोठी चमक पाहायला मिळत आहे.
दरम्यान, या नवरात्र उत्सवाच्या पावन पर्वात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी देशातील केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अधिक खास आहे. कारण की केंद्रातील मोदी सरकारने सणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आज अर्थातच 18 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 4% वाढवण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. खरंतर सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 42 टक्के एवढा आहे.
त्यामध्ये आता चार टक्के वाढ करण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे. याचाच अर्थ महागाई भत्ता 46% एवढा होणार आहे. विशेष म्हणजे ही वाढ जुलै महिन्यापासून लागू केली जाणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या वेतना सोबत म्हणजे जे वेतन सप्टेंबर महिन्यात मिळेल त्यासोबत याचा लाभ रोखीने मिळणार आहे.
याचाच अर्थ जुलै, ऑगस्ट सप्टेंबर या तीन महिन्याची महागाई भत्ता थकबाकी देखील कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. यामुळे दिवाळीच्या आधीच सरकारी नोकरदारांना मोठी भेट मिळाली असल्याचे सांगितले जात आहे. अशातच, आता महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या 17 लाख कर्मचाऱ्यांना केव्हा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळेल ? याकडे राज्य कर्मचाऱ्यांचे विशेष लक्ष लागून राहणार आहे.
दरम्यान, राज्य कर्मचाऱ्यांना देखील दिवाळीच्या आधीच महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळू शकतो असे काही मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितले जात आहे. यामुळे आता याबाबत शिंदे-फडणवीस-पवार सरकार केव्हा निर्णय घेते हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.