7th Pay Commission : भारतीय निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी 18 व्या लोकसभेसाठी निवडणुकांची घोषणा करू शकते. यामुळे संपूर्ण देशभरात निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. दरम्यान, आगामी लोकसभेत विजयी पताका फडकवण्याची लालसा ठेवणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारने नुकताच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा अन मोठा निर्णय घेतला आहे.
केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्के एवढा होता. यात आता चार टक्क्यांची वाढ झाली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% एवढा झाला आहे.
विशेष म्हणजे ही वाढ जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आली आहे. परंतु याचा रोख लाभ मार्च महिन्याच्या वेतनासोबत म्हणजेच जे वेतन एप्रिल महिन्यात कर्मचाऱ्यांच्या हातात येईल त्या वेतनासोबत दिला जाणार आहे. अर्थातच केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील दिली जाणार आहे.
दरम्यान आता केंद्रानंतर राज्य सरकारमधील कार्यरत राज्य कर्मचाऱ्यांना देखील महागाई भत्ता वाढीची भेट मिळू लागली आहे. ओडिशा मधील राज्य कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना नुकतीच ही मोठी भेट मिळाली आहे.
मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी काल अर्थातच 14 मार्च 2024 रोजी एक मोठा निर्णय घेत तेथील राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत (DR) मध्ये 4 टक्के वाढ जाहीर केली आहे.
ही महागाई भत्ता वाढ एक जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आली आहे. आधी ओडिशा येथील राज्य कर्मचाऱ्यांना 46 टक्के दराने महागाई भत्ता मिळत होता.
यामध्ये आणखी चार टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय तेथील राज्य सरकारने घेतला असल्याने आता तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% एवढा झाला आहे. विशेष म्हणजे ही वाढ जानेवारी 2024 पासून लागू राहणार असल्याने तेथील राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची देखील रक्कम मिळणार आहे.
या राज्य सरकाराने देखील वाढवला महागाई भत्ता
आसाममधील राज्य कर्मचाऱ्यांना देखील चार टक्के महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आली आहे. तेथील राज्य कर्मचाऱ्यांना देखील 50% दराने महागाई भत्ता मिळणार आहे. झारखंड येथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील 50% एवढा झाला आहे. उत्तर प्रदेश मधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील वाढवण्यात आला आहे. अरुणाचल प्रदेशातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील 50% एवढा झाला आहे.
महाराष्ट्रात काय आहे परिस्थिती ?
महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ अजून लागू झालेली नाही. केंद्राच्या निर्णयानंतर अनेक राज्यांनी तेथील राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ लागू केली आहे. मात्र महाराष्ट्र राज्य शासनाने अजूनही याबाबत सकारात्मक निर्णय घेतलेला नाही.
परंतु महाराष्ट्र राज्य शासनाने केंद्राच्या सूचनेनंतर महाराष्ट्र राज्यात कार्यरत असलेल्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर 50 टक्के एवढा केला आहे. यामुळे लवकरच महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांना देखील चार टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळेल अशी आशा आता व्यक्त होऊ लागली आहे.