7th Pay Commission : देशात पुढील महिन्यापासून सणासुदीचा हंगाम सुरू होणार आहे. सप्टेंबर महिना येत्या सात दिवसात संपेल आणि त्यानंतर ऑक्टोबर महिन्याची सुरुवात होणार आहे. ऑक्टोबर महिन्यात संपूर्ण देशात विविध सणांचा हंगाम राहणार आहे. पुढल्या महिन्यात विजयादशमी अर्थातच दसरा आणि दिवाळीचा मोठा सण साजरा केला जाणार आहे.
दरम्यान या सणासुदीच्या काळात देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांना एक मोठे गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्र शासन केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवणार आहे. खरंतर महागाई भत्त्या बाबत गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा पाहायला मिळत आहेत.
प्रसार माध्यमांमध्ये देखील याबाबत मोठ्या चर्चा रंगत आहेत. काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये जुलै महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना तीन टक्के महागाई भत्ता वाढ दिली जाईल असे सांगितले जात होते. पण यावेळी सुद्धा चार टक्के महागाई भत्ता वाढवला जाईल असा दावा एका प्रतिष्ठित वृत्त संस्थेमध्ये करण्यात आला आहे.
महागाई भत्ता सामान्यतः जानेवारी आणि जुलैमध्ये सुधारित केला जातो. तथापि, डीए वाढ आणि पेमेंटमधील वाढ याची घोषणा थोड्याशा विलंबाने जाहीर केली जाते. यावेळी देखील जुलै महिन्यापासूनची महागाई भत्ता वाढीची घोषणा पुढल्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे.
ऑक्टोबर महिन्यात याची घोषणा होईल आणि ऑक्टोबरच्या वेतना सोबत म्हणजेच जे वेतन सप्टेंबर महिन्यात कर्मचाऱ्यांच्या हातात पडेल त्या वेतनासोबत याची अंमलबजावणी होणार आहे. अर्थातच केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील यावेळी मिळणार आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्याच्या महागाई भत्ता फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग होणार आहे.
सध्या स्थितीला केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे आणि यामध्ये चार टक्के वाढ होणे अपेक्षित आहे याचाच अर्थ केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जुलै महिन्यापासून 46 टक्के एवढा होईल. निश्चितच सणासुदीच्या दिवसांमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला तर त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढणार
खरंतर महागाई भत्ता हा CPI-IW च्या निर्देशांकावरून ठरवला जातो. या निर्देशांकावरूनच महागाई भत्ता वाढ ठरवली जाते. तसेच DA वाढवण्यासाठी एक फॉर्म्युला देखील सेट करण्यात आला आहे. 7th CPC DA% = [{Average of AICPI-IW (Base Year 2001=100) for the last 12 months – 261.42}/261.42×100] असा हा फॉर्मुला आहे. आता जून महिन्याच्या मागील बारा महिन्यांची सीपीआय-आयडब्ल्यूच्या निर्देशांकाची सरासरी 382.32 एवढी आहे. यामुळे या फॉर्म्युल्यानुसार जुलै महिन्यापासून [{382.32-261.42}/261.42×100]= 46.24 एवढा महागाई भत्ता वाढला पाहिजे. मात्र डीए वाढवताना दशांश मधील संख्या विचारात घेतली जात नाही. याचाच अर्थ जुलै महिन्यापासून चार टक्के डीए वाढ लागू होणार आहे.