7th Pay Commission : नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50 टक्के करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे. अर्थातच महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढला आहे. ही वाढ जानेवारी 2024 पासून लागू आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला गेला होता. मार्च महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला गेला. ही वाढ मात्र जानेवारी महिन्यापासूनच लागू झाली.
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी महिन्यापासून 46 टक्क्यांवरून 50 टक्के करण्यात आला. याचा रोख लाभ मार्च महिन्याच्या पगारांसोबत मिळाला. म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कमही मिळाली. याच धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना देखील जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आली आहे.
याचा रोख लाभ हा जुलै महिन्याच्या पगारांसोबत म्हणजेच ऑगस्ट महिन्यात जो पगार हातात येईल त्या पगारांसोबत दिला जाणार आहे. एकंदरीत आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% एवढा झाला आहे.
यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आता चाहूल लागली आहे ती घर भाडे भत्ता वाढीची. सातवा वेतन आयोगामध्ये घर भाडे भत्ता वाढीसंदर्भात एक मोठी तरतूद आहे. या तरतुदीनुसार जेव्हा सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% होईल तेव्हा त्यांचा घरभाडे भत्ता वाढवला जाणार आहे.
गेल्यावेळी पंचवीस टक्के महागाई भत्ता झाल्यानंतर घर भाडे भत्ता वाढवण्यात आला होता. आता 50 टक्के महागाई भत्ता झाला असल्याने घर भाडे भत्ता पुन्हा वाढणार आहे. दरम्यान याच संदर्भात 04 जुलैला केंद्र शासनामार्फत एक महत्त्वाचे कार्यालयीन ज्ञापन निर्गमित करण्यात आले आहे.
यामध्ये घर भाडे भत्ता वाढ जानेवारी 2024 पासून लागू झाली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना घर भाडे भत्ता एक्स, वाय आणि झेड श्रेणीनुसार अनुक्रमे 27, 18 आणि नऊ टक्के एवढा घर भाडे भत्ता दिला जात होता.
आता मात्र महागाई भत्ता 50% झाला असल्याने घर भाडे भत्ता देखील तीन टक्क्यांपर्यंत वाढला आहे. यानुसार आता एक्स, वाय आणि झेड श्रेणीच्या कर्मचाऱ्यांना अनुक्रमे 30 टक्के, 20 टक्के आणि 10% एवढा घर भाडे भत्ता लागू झाला आहे.