7th Pay Commission : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी आणि अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याआधीच केंद्रातील मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी आज अखेर केंद्रातील मोदी सरकारने महागाई भत्ता वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे.
खरेतर गेल्या अनेक दिवसांपासून महागाई भत्ता वाढीबाबत प्रसार माध्यमांमध्ये चर्चा सुरू होत्या. केंद्रातील मोदी सरकार आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची भेट देणार असा दावा काही मीडिया रिपोर्टमध्ये केला जात होता.
सूत्रांच्या माध्यमातून अशी माहिती आमच्याही हाती येत होती. दरम्यान आज याच मुद्द्यावर सकारात्मक निर्णय केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवला आहे.
आज अर्थातच 7 मार्च 2024 रोजी झालेल्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50% एवढा करण्यात आला आहे. हा महागाई भत्ता जानेवारी 2024 पासून लागू केला जाणार आहे. मात्र, याचा रोखीने लाभ या चालू महिन्याच्या वेतनासोबत दिला जाणार आहे.
याचाच अर्थ मार्च महिन्याच्या वेतनासोबत म्हणजेच जे वेतन कर्मचाऱ्यांच्या हातात एप्रिल महिन्यात येईल त्या वेतनासोबत आता महागाई भत्ता वाढीचा लाभ केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. तसेच जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांना वितरित केली जाणार आहे.
विशेष बाब अशी की फक्त महागाई भत्ताच नाही तर घर भाडे भत्ता वाढवण्याचा आणि ग्रॅच्यूईटीची रक्कम वाढवण्याचा देखील निर्णय या आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला आहे. साहजिकच, आगामी लोकसभेच्या पूर्वीच केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारने दिलेली ही एक मोठी भेट ठरणार आहे.
HRA पण वाढणार
7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, महागाई भत्ता 50% झाल्यानंतर घरभाडे भत्ता वाढवला जाईल. यानुसार आता घर भाडे भत्ता देखील वाढणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार एचआरए वाढीसाठी शहरांची तीन श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे.
ही श्रेणी X, Y आणि Z अशी आहे. यानुसार आता X श्रेणीमधील कर्मचाऱ्यांचा HRA 30 टक्के होणार आहे. त्याचप्रमाणे Y श्रेणीमधील कर्मचाऱ्यांचा HRA दर 20 टक्के होणार आहे. तसेच Z श्रेणीमधील कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता 10 टक्के होणार आहे.
आतापर्यंत घरभाडे भत्ता X, Y, Z श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना अनुक्रमे 27, 18 आणि 9 टक्के या दराने मिळत होता. म्हणजे सरकारच्या या नवीन निर्णयानुसार घरभाडे भत्ता तीन टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
ग्रॅच्युइटीची मर्यादाही वाढली
एवढेच नाही तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युईटीची मर्यादा 20 लाखांवरून 25 लाख रुपये करण्याचा मोठा निर्णय आज केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत घेऊन केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देण्याचे काम केले आहे. दरम्यान, आज झालेल्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत झालेल्या या निर्णयामुळे सरकारवर 12,869 कोटी रुपयांचा बोजा वाढणार आहे.