7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, मार्च 2024 ला केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मार्च महिन्यात अर्थातच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा जानेवारी महिन्यापासूनचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवला.
आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना 46 टक्के दराने महागाई भत्ता मिळतं होता. मात्र यामध्ये मार्च महिन्यात चार टक्क्यांची वाढ झाली. महागाई भत्ता 50% झाला. याबाबतचा निर्णय मार्च 2024 मध्ये घेतला असला तरीही ही वाढ जानेवारी 2024 पासून लागू झाली.
यामुळे महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता फरकाचा देखील लाभ संबंधित नोकरदार मंडळीला आणि पेन्शनधारकांना मिळाला.
विशेष बाब अशी की केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा फक्त महागाई भत्ताच वाढला आहे असे नाही तर महागाई भत्ता समवेतच कर्मचाऱ्यांसाठी लागू असणारे इतर 8 भत्तेही वाढवण्यात आले आहेत.
या संदर्भात केंद्र सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने नुकताच एक शासन निर्णय काढला आहे. दरम्यान आज आपण केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई पत्ता 50 टक्क्यांवर पोहोचल्यानंतर कोणकोणते भत्ते वाढवले आहेत या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कोण कोणते भत्ते वाढलेत?
गुरुवार, 4 जुलै, 2024 रोजी केंद्र सरकारच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचे शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. यात असे म्हटले आहे की, जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50 टक्के झाला असल्याने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी लागू असणारे इतर आठ प्रकारचे भत्ते वाढवण्यात आले आहेत.
या भत्त्यांमध्ये तब्बल 25 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. दूरस्थ स्थान, वाहतूक भत्ता, अपंग महिलांच्या मुलांसाठी विशेष भत्ता, मुलांसाठी शैक्षणिक भत्ता, घरभाडे भत्ता, ड्रेस भत्ता, कर्तव्य भत्ता, प्रतिनियुक्ती (कर्तव्य) भत्ता असे आठ प्रकारचे भत्ते 25 टक्क्यांनी वाढवले गेले आहेत.