7th Pay Commission : लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखा काल जाहीर झाल्यात आणि कालपासूनच देशात आचारसंहिता जाहीर झाली आहे. तत्पूर्वी मात्र केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी मोठा निर्णय घेतलेला आहे. केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्के एवढा केला आहे.
आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46% होता. यात चार टक्क्यांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे ही महागाई भत्ता वाढ जानेवारी 2024 पासून लागू झाली आहे.
तसेच याचा लाभ मार्च महिन्याच्या वेतना सोबत म्हणजे एप्रिल महिन्यात कर्मचाऱ्यांच्या हातात जे वेतन येईल त्यासोबत दिला जाणार आहे.
विशेष म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील अखिल भारतीय सेवेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचा देखील महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे.
याबाबतचा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने घेतला असून याचा शासन निर्णय हा 13 मार्च 2024 ला निर्गमित करण्यात आला आहे. म्हणजे आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच या सदर अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला आहे.
अशा परिस्थितीत आज आपण अखिल भारतीय सेवेत कार्यरत असलेल्या या अधिकाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता फरकाचा लाभ केव्हा मिळणार ? याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सामान्य प्रशासन विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार, अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी 2024 पासून वाढवण्यात आला आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवरच या देखील अधिकाऱ्यांना मार्च महिन्याचा पगारासोबतच याचा रोख लाभ मिळणार आहे.
म्हणजे मार्च महिन्यातील जो पगार एप्रिल महिन्यात कर्मचाऱ्यांच्या हातात येईल त्या वेतनासोबत अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जाणार आहे.
जानेवारी महिन्यापासून याची अंमलबजावणी होणार असल्याने जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यातील महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील या सदर अधिकाऱ्यांना या वेतनासोबत मिळणार आहे. त्यामुळे होळी सणाच्या पार्श्वभूमीवर या सदर अधिकाऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे.