7th Pay Commission : होळीआधीच सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्रातील मोदी सरकारने एक मोठी भेट दिली आहे. खरंतर, होळी सणानंतर देशात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. यामुळे आत्तापासूनच निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. अशा परिस्थितीत, सर्वसामान्यांना, सरकारी कर्मचाऱ्यांना, शेतकऱ्यांना, शेतमजुर अशा विविध घटकांना खुश करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.
याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा महागाई सवलत (DR) आणि महागाई भत्ता (DA) वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रातील मोदी सरकारने महागाई भत्ता मध्ये आणखी 4 टक्क्यांनी वाढ करण्याची मोठी घोषणा केली आहे.
याचा अर्थ आता केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना त्यांच्या मूळ वेतनाच्या ५० टक्के इतका महागाई भत्ता मिळणार आहे. आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46 टक्के दराने महागाई भत्ता मिळत होता. आता हा भत्ता 50% एवढा झाला आहे.
जानेवारी 2024 पासून ही वाढ लागू राहणार आहे. विशेष म्हणजे याचा लाभ मार्च महिन्याच्या वेतनासोबत म्हणजेच एप्रिल महिन्यात जे वेतन कर्मचाऱ्यांना मिळेल त्या वेतना सोबत दिला जाणार आहे.
महागाई भत्ता वाढ जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली असल्याने जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
दरम्यान आता आपण महागाई भत्ता 50% झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार हे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
महागाई भत्ता वाढल्याने पगार किती वाढणार ?
ज्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्याला 25,600 रुपये प्रति महिना एवढा मूळ पगार मिळत असेल त्याला आधीच्या 46 टक्के दरानुसार 11,776 रुपये एवढा महागाई भत्ता मिळतं आहे. पण आता महागाई भत्ता 50% झाला आहे.
यामुळे हा महागाई भत्ता वाढणार आहे. आता महागाई भत्ता 50 टक्के होणार असल्याने ही DA ची रक्कम 12,800 रुपये होईल. आता बारा हजार आठशे रुपयातून 11 हजार 776 रुपये वजा केल्यास जी रक्कम शिल्लक राहील तेवढी रक्कम म्हणजेच 1,024 रुपयांची वाढ होणार आहे.
म्हणजेच वार्षिक आधारावर सदर कर्मचाऱ्यांच्या पगारात बारा हजार 288 रुपयांची वाढ होणार आहे. त्यामुळे निश्चितच सदर कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे.
किती मिळणार महागाई भत्ता फरक
महागाई भत्ता फरक म्हणून 25 हजार 600 रुपये प्रति महिना मूळ पगार असलेल्या कर्मचाऱ्याला 2 हजार 48 रुपये मिळणार आहेत. याचा देखील लाभ मार्च महिन्याच्या वेतनासोबत म्हणजे एप्रिल महिन्यात कर्मचाऱ्यांच्या हातात जो पगार येईल त्या पगारांसोबत मिळणार आहे.