7th Pay Commission : केंद्रातील मोदी सरकारने लोकसभा निवडणुकीच्या आधी म्हणजे आपल्या दुसऱ्या कार्यकाळात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला होता. मार्चमध्ये झालेल्या या निर्णयाअन्वये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा जानेवारी 2024 पासूनचा महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे. आधी महागाई भत्ता 46 टक्के एवढा होता. मात्र यामध्ये चार टक्क्यांची वाढ करण्यात आली.
म्हणजे हा महागाई भत्ता आता 50 टक्के एवढा आहे. मार्च महिन्यात याचा निर्णय झाला असला तरी देखील ही वाढ जानेवारी 2024 पासूनच लागू आहे. दरम्यान आता केंद्रातील मोदी सरकार आपल्या तिसऱ्या कार्यकाळात जुलै महिन्यापासूनचा महागाई भत्ता सुधारित होणार आहे.
एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार महागाई भत्ता ठरवला जात असतो. दरम्यान या चालू वर्षातील जानेवारी ते जून या कालावधीमधील एआयसीपीआयची आकडेवारी पाहून महागाई भत्ता ठरणार आहे.
परंतु आत्तापर्यंत जानेवारी ते एप्रिल या महिन्याचीच आकडेवारी समोर आली आहे. मे महिन्याची आकडेवारी जून अखेरपर्यंत समोर यायला हवी होती मात्र ही आकडेवारी अजून जाहीर झालेली नाही.
आता मे आणि जून या दोन्ही महिन्यांची आकडेवारी सोबतच येऊ शकते असा अंदाज आहे. ही आकडेवारी समोर आल्यानंतर जुलै महिन्यापासून महागाई भत्ता किती वाढणार हे स्पष्ट होणार आहे.
दुसरीकडे महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा जानेवारी महिन्यापासूनचा महागाई भत्ताच वाढलेला नाही. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील 50% करणे अपेक्षित आहे. केंद्रातील सरकारने महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेऊन आता चार महिने पूर्ण झाले आहेत.
यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50% करण्याबाबतचा जीआर कधी निघणार हा मोठा सवाल उपस्थित केला जातोय. दरम्यान याच संदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे. राज्यातील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीचा निर्णय कधी होणार? याची नवीन तारीख समोर आली आहे.
कधीपर्यंत निर्णय घेतला जाणार ?
मिळालेल्या माहितीनुसार, राज्याच्या विधिमंडळात सध्या सुरू असलेले पावसाळी अधिवेशन संपेपर्यंत राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीचा निर्णय अंतिम केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव यांनी याबाबतचा शासन निर्णय 11 जुलै पर्यंत काढला जाईल असे म्हटले आहे. दरम्यान जर या कालावधीत याबाबतचा शासन निर्णय निघाला नाही तर जुलै अखेरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत याचा जीआर जारी होण्याची शक्यता आहे.
रोख लाभ कधी मिळणार?
जर जुलै महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50% करण्याबाबतचा जीआर निघाला तर जुलै महिन्याच्या पगारांसोबतच याचा रोख लाभ मिळणार आहे. मात्र ही महागाई भत्ता वाढ जानेवारी 2024 पासून लागू राहणार आहे. यामुळे जानेवारी ते जून या कालावधीमधील महागाई भत्ता फरकाची रक्कमही कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे.