Government Scheme : शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्रातील मोदी सरकार देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांना दिवाळीची मोठी भेट देणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता दिवाळीच्या काळातच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची योजना सरकारने आखली आहे.
यासाठी सध्या शासन स्तरावर युद्धपातळीवर काम सुरू आहे. महाराष्ट्रातील 85 लाखाहुन अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. परिणामी राज्यातील लाखो शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल अशी आशा व्यक्त होत आहे. खरंतर, पीएम किसान सन्मान निधी योजना ही एक केंद्रीय पुरस्कृत योजना आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. 2019 मध्ये ही योजना सर्वप्रथम सुरू करण्यात आली. तेव्हापासून आजतागायत ही योजना अविरतपणे सुरू आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये दिले जात आहेत.
दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे या योजनेच्या पैशांचे वितरण होत आहे. दर चार महिन्यांनी एक हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जात आहे. आत्तापर्यंत 14 हफ्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत. 14 वा हफ्ता 27 जुलै 2023 रोजी देशातील 8.50 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे.
आपल्या महाराष्ट्राचा विचार केला असता चौदाव्या हप्त्यापोटी राज्यातील 85 लाख 60 हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात 1 हजार 866 कोटींहून अधिक रक्कम जमा झाली होती. दरम्यान या योजनेचा चौदावा हप्ता जमा होऊन आता साडेतीन महिन्यांपेक्षा अधिकचा काळ उलटला आहे.
यामुळे या योजनेचा पुढील हप्ता केव्हा जमा होणार हा सवाल शेतकऱ्यांकडून सातत्याने उपस्थित केला जात होता. दरम्यान, केंद्र शासनाच्या कृषी विभागाकडून या योजनेचा पुढील हप्ता 15 नोव्हेंबर 2023 रोजी अर्थातच भाऊबीजच्या दिवशी जमा केला जाणार अशी माहिती समोर आली आहे.
15 नोव्हेंबरला दुपारी तीन वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचा पुढील हप्ता जमा केला जाणार आहे. एक ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर या कालावधीतील १५ व्या हप्त्यापोटी प्रत्येकी दोन हजार रुपयांचे मानधन शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात वर्ग केले जाणार आहेत.
यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी निश्चितच गोड होणार आहे यात शंका नाही. तथापि ज्या शेतकऱ्यांनी केवायसीची प्रक्रिया केलेली नसेल त्यांना या योजनेचा पंधरावा हप्ता मिळणार नाही असे देखील सांगितले जात आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर केवायसीची प्रक्रिया करून घेणे अपेक्षित आहे. सोबतच बँक खात्यासोबत आधार लिंक करणे, जमिनीच्या कागदपत्रांची पडताळणी देखील पुढील हप्त्याच्या लाभासाठी अनिवार्य राहणार आहे.