8th Pay Commission : देशभरातील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच विविध राज्यातील राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषयाबाबत म्हणजेच वेतन आयोग संदर्भात.
लोकसभा निवडणुकीआधी आठवा वेतन आयोगाच्या मोठ्या प्रमाणात चर्चा रंगल्यात. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकार आठवा वेतन आयोग लागू करेल असा दावा केला जात होता.
मात्र तसे काही झाले नाही. पण, आता तिसऱ्यांदा सरकार स्थापित केल्यानंतर केंद्रातील सरकार नवीन आठवा वेतन आयोग बाबत घोषणा करणार असे बोलले जात आहे. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू आहे. वेतन आयोगाचा आत्तापर्यंतचा ट्रेंड जर पाहिला तर प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू झाला आहे.
पहिला वेतन आयोग 1946 मध्ये लागू झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू झाला आहे. सध्याचा सातवा वेतन आयोग हा 2016 मध्ये लागू झाला. या अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या पगारात 14.29 टक्क्यांची वाढ झाली होती.
सातव्या वेतन आयोगामुळे किमान पगार हा 18000 रुपयांवर पोहोचला आहे. पण सातवा वेतन आयोग लागू होण्यापूर्वी त्याच्या समितीची स्थापना झाली होती, या समितीची स्थापना सरकारने 2014 मध्ये केली होती. समितीने सरकारकडे अहवाल सुपूर्द केल्यानंतर 2016 मध्ये नवीन सातवा वेतन आयोग लागू झाला होता.
याच धर्तीवर आता 2024 मध्ये आठवा वेतन आयोगासाठी समितीची स्थापना होणार अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच, याबाबतचा निर्णय हा येत्या अर्थसंकल्पात म्हणजेच 23 जुलैला सादर होणाऱ्या केंद्राच्या पूर्ण अर्थसंकल्पात घेतला जाणार आहे. तथापि, सरकारी कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष 1 जानेवारी 2026 पासून आठवा वेतन आयोग बहाल होऊ शकतो, अशा चर्चा सध्या सुरू आहेत.
या अनुषंगाने सध्या सरकारी पातळीवर हालचाली देखील सुरू झाल्या आहेत. जॉइंट कंसल्टिव मशीनरी फॉर सेंट्रल गव्हर्नमेंट एम्पलॉइज नॅशनल काउंसिलचे सचिव शिव गोपाल मिश्रा यांनी यासंदर्भात कॅबिनेट सचिव महोदय यांना एक महत्त्वाचे पत्र पाठवले आहे. यात कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.
यामध्ये महत्त्वाची मागणी आहे ती 8th Pay Commission ची. यामुळे केंद्रीय सरकारी कर्मचारी महासंघाच्या मागणीकडे सरकार कशा तऱ्हेने पाहते, याबाबत सकारात्मक निर्णय घेते का? हे विशेष पाहण्यासारखे ठरणार आहे. दरम्यान, आज आपण जर सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू झाला तर त्यांच्या पगारात किती वाढ होणार या संदर्भात माहिती पाहणार आहोत.
पगार कितीने वाढणार ?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्याचा म्हणजे सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर 2.57 पट झाला. यामुळे त्यांचा मुळ पगार 14.29 टक्के वाढला होता अन कमीत कमी पगार 18 हजार रुपये झाला होता. तसेच, आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर हा 3.68 पट एवढा होणार आहे.
यामुळे बेसिक पगार आठ हजार रुपयांनी वाढणार आहे. अर्थातच सध्याचा कमीत कमी पगार हा 18,000 रुपयांवरून 26 हजार रुपयांवर जाणार आहे. तज्ञ लोकांनी सांगितल्याप्रमाणे, आगामी वेतन आयोगामुळे कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी आणि महागाई भत्ता मिळून त्यांचा एकूण पगार हा 23 ते 35 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.