Agriculture News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे काल अर्थातच 18 डिसेंबर 2023 रोजी हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 20 हजार रुपयांचा बोनस देण्याची जाहीर केले आहे.
धान अर्थातच भात पिकांची कोकण आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे. कोकणातील दक्षिणेमधील जिल्हे आणि विदर्भातील पूर्वेकडील जिल्हे धान उत्पादनासाठी विशेष ओळखले जातात. दरम्यान याच धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी काल विधानसभेत महत्वाची घोषणा करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळालेल्या बोनस मध्ये यावर्षी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांच्या माध्यमातून शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. धान पिकासाठी 2022-23 मध्ये हेक्टरी 15000 रुपये एवढा बोनस जाहीर करण्यात आला होता.
यामध्ये मात्र आता पाच हजाराची वाढ झाली आहे. हा बोनस आता वीस हजार एवढा झाला आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असा आशावाद देखील व्यक्त केला जात आहे. खरंतर आगामी वर्षे निवडणुकांचे वर्ष आहे. यामुळे निवडणुकांच्या काळात शेतकऱ्यांची नाराजी ओढवणे सरकारला महाग पडू शकते.
हेच कारण आहे की राज्यशासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना कृषी करण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. बोनस वाढवण्याची घोषणा देखील त्याचाच एक भाग समजला जातोय. निश्चितच, वर्तमान शिंदे फडणवीस पवार सरकारने घेतलेला हा निर्णय दुष्काळग्रस्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा ठरणार आहे.
कर्जमाफी पण होणार
धान उत्पादकांना बोनस देण्यासोबतच मुख्यमंत्र्यांनी आणखी एक मोठी घोषणा केली. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफी पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय झाला आहे.
खरेतर वर्तमान उपमुख्यमंत्री तथा तत्कालीन देवेंद्र फडणवीस यांनी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबवली. त्या अंतर्गत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. कर्जमाफीसाठी जवळपास 50 लाखाहून अधिक शेतकरी पात्र ठरलेत.
पण यामध्ये 44 लाख शेतकऱ्यांनाचं फक्त 18 हजार 762 कोटी इतका कर्जमाफीचा लाभ मिळाला. सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी निर्माण झाल्याने जवळपास 6 लाख 56 हजार शेतकरी यापासून वंचित राहीले.
यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या वंचित शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे अशी मागणी जोर धरत होती. दरम्यान काल अर्थात 18 डिसेंबरला राज्यातील या कर्ज माफीपासून वंचित 6.56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली आहे.