Ahmednagar Farmer Scheme News : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात बहुसंख्य लोकांचा शेती हा व्यवसाय आहे. यामुळे भारताला शेतीप्रधान देशाचा दर्जा मिळाला आहे. अलीकडे मात्र शेतीचा हा व्यवसाय खूपच आव्हानात्मक झाला आहे. अनेकांना शेतीमधून फारशी कमाई होत नसल्याचे वास्तव आहे. फक्त शेतीचाच व्यवसाय नाही तर शेतीशी निगडित उद्योगधंदे देखील अडचणीत आले आहेत.
पशुपालनाचा म्हणजेच दुधाचा धंदा देखील गेल्या काही वर्षांपासून मोठ्या संकटात सापडला असून शेतकऱ्यांना दुधाच्या धंद्यातून अपेक्षित अशी कमाई होत नाहीये. पशुपालकांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही वर्षांमध्ये पशुखाद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
याशिवाय दुधाळ जनावरांच्या किमती वाढल्या आहेत, महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे, मजुरीचे दर वाढत आहेत. तसेच पेट्रोल आणि डिझेल मध्ये देखील मोठी दरवाढ होत आहे. यामुळे दुधाच्या धंद्यात उत्पादन खर्च आधीच्या तुलनेत खूपच अधिक करावा लागत आहे.
दुसरीकडे दुधाला मात्र बाजारात फारसा भाव मिळत नाहीये. हवामान बदलामुळे जनावरांपासून पूर्ण क्षमतेने दूध मिळवता येत नाहीये. म्हणजेच अधिकचा चारा किंवा पशुखाद्य देऊनही अनेकदा जनावरे कमी दूध देत आहेत. यामुळे दुधाचा व्यवसाय हा तोट्याचा ठरू लागला आहे.
परिणामी काही शेतकऱ्यांनी हा व्यवसाय आता बंद केला आहे. दरम्यान, गायीच्या दुधाला अपेक्षित असा भाव मिळत नसल्याने नाराज शेतकऱ्यांनी गायीच्या दुधाला अनुदान देण्याची मागणी केली होती. या मागणीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शिंदे सरकारने गायीच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
11 जानेवारी ते 10 मार्च या कालावधीत दूध विक्री केलेल्या शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे. या अनुदान योजनेत अहमदनगर जिल्ह्यातील जवळपास 91 हजार दूध उत्पादक शेतकरी पात्र ठरले असून त्यांना अनुदानाचा पैसा वितरित देखील करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील 90 हजार 566 शेतकऱ्यांना 76 कोटी आठ लाख 56 हजार 795 रुपये मिळाले आहेत. हे मंजूर पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत.
त्यामुळे दूध उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनेचे सर्वाधिक लाभार्थी संगमनेर तालुक्यातील आहे. तालुक्यातील दूध उत्पादकांना या योजनेमुळे निश्चितच मोठा दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.