Ahmednagar News : महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वाधिक मोठा जिल्हा म्हणून अहमदनगर जिल्ह्याची ख्याती सबंध देशभरात आहे. शिवाय अहमदनगर जिल्ह्याचा सहकार क्षेत्रात मोठा डोलारा आहे. हेच कारण आहे की, अहमदनगर जिल्ह्याचे महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व असे स्थान आहे.
वास्तविक, अहमदनगर हा आकारमानाने मोठा जिल्हा आहे. यामुळे जिल्ह्यातील शेवटच्या टोकाला वसलेल्या नागरिकाला जिल्ह्याच्या मुख्यालयी जाताना लांबचा प्रवास करून जावं लागतं. यामुळे नागरिकांचा जिल्हा मुख्यालयी असलेली कामे करताना अधिकचा वेळ खर्च होतो.
यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी केली जात आहे. खरंतर जिल्हा विभाजनाचा हा मुद्दा आपल्यापैकी अनेकांचा जन्मही झाला नसावा तेव्हापासून जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय राहिला आहे. दरम्यान, जिल्ह्यासंदर्भात नुकताच महाराष्ट्र राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला. या निर्णयानुसार, जिल्ह्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी पद मंजूर करण्यात आले.
तसेच अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डी मध्ये सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे अहमदनगरचे पुण्यश्लोक अहिल्यानगर असं नामकरण केल्यानंतर आणि शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय शासनाने सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याने हे जिल्हा विभाजनाकडे टाकलेले पाऊल असल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात यामुळे मात्र मोठी उलथापालत सुरू आहे.
शासनाच्या या निर्णयावर वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. अनेक ठिकाणी शासनाच्या या निर्णयाचे स्वागत झाले तर काही ठिकाणी याचा विरोधही होत आहे. अशा परिस्थितीत, आज अर्थातच 15 जून 2023 रोजी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात एक स्पष्टीकरण दिले आहे.
पाटील यांनी सांगितले की, जिल्ह्यातील काही तालुक्यातील नागरिकांना कामानिमित्त नगरमध्ये येणे गैरसोयीचे होत होते. म्हणून एक अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डी येथे सुरू केले जाणार आहे. यामुळे याचा आणि जिल्हा विभाजनाचा कुठलाच संबंध नाही.
अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होणार नाही ?
याबाबत अधिक बोलताना पाटील यांनी सांगितले की, “माझ्याकडे महसूल खाते आल्यानंतर मी जिल्ह्यातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. जिल्हा विभाजनाचा निर्णय अजून झालेला नाही. जिल्हा विभाजनाचा निर्णय झाला की मग जिल्हाधिकारी कार्यालय कुठे करायचं यावर निर्णय होईल. मात्र यावर काही लोक राजकारण करत आहेत. “
एकंदरीत शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू झाले म्हणून लगेचच जिल्हा विभाजन होणार नाही असे महसूल मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात हालचाली वाढल्या आहेत.