Ahmednagar News : केंद्र शासनाच्या माध्यमातून देशातील गरीब जनतेला स्वस्त धान्य पुरवले जात आहे. पीएम गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून रास्त भावात रेशन कार्डधारकांना अन्नधान्य उपलब्ध होत आहे. विशेष बाब अशी की डिसेंबर 2023 पर्यंत केंद्र शासनाच्या माध्यमातून मोफत रेशन पुरवले जात आहे.
मात्र, याचा अनेक लोक चुकीचा लाभ घेत असल्याचे उघडकीस आले आहे. यात एका व्यक्तीचे नाव एकापेक्षा अधिक रेशन कार्ड मध्ये दाखल असून एक व्यक्ती दोन ठिकाणी लाभ घेत असल्याचे उघडकीस आले आहे. रेशनकार्डला आधार कार्ड जोडणी कंपल्सरी करण्यात आली असल्याने एकच व्यक्ती दोन दोन रेशन कार्ड वर लाभार्थी असल्याचे उघडकीस आले आहे.
रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंकिंगमुळे हे शक्य बनले असून आता अशा दोन ठिकाणी लाभार्थी असलेल्या व्यक्तीचे एका रेशन कार्ड मधून नाव वगळण्यात येणार असून त्याला केवळ एका रेशन कार्डचा लाभ दिला जाणार आहे. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, वन नेशन वन रेशन कार्ड योजनेअंतर्गत रेशन कार्ड मधील दुबार नावांची छाननी केली जात आहे.
अहमदनगर जिल्ह्यातही रेशन कार्ड मधील दुबार नावांची पडताळणी करण्यात आली आहे. यात आत्तापर्यंत 8 हजार 42 लोकांची दोन दोन रेशन कार्ड वर नावे असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे आता या दोन-दोन रेशन कार्ड मध्ये नावे असलेल्या लाभार्थ्यांची एका रेशन कार्डवरील नाव रद्द केल जाणार आहे.
दोन-दोन रेशन कार्डमध्ये नावे कसं काय ऍड झालीत?
अनेकदा मुलगी लग्न होऊन सासरला जाते. नववधू सासरी जाते आणि सासरमधील रेशन कार्डमध्ये नववधूचे नाव जोडले जाते. त्याचवेळी, माहेरकडील रेशनकार्ड मधील नाव कमी करणे गरजेचे राहते. मात्र अनेक लोक हे काम करत नाहीत.
यामुळे अशा व्यक्तींचे दोन-दोन रेशन कार्ड मध्ये नाव टाकले जाते आणि दोन्ही रेशन कार्डचा लाभ या व्यक्तीला मिळू लागतो. यामुळे अशा व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना केवळ एकाच रेशन कार्ड वरील लाभ यापुढे दिला जाणार आहे. यासाठी रेशन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक केले जात आहे. तसेच पुरवठा निरीक्षक व स्वस्त धान्य दुकानदार यांच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थ्यांची पडताळणी केली जात आहे.
अहमदनगर जिल्ह्यात आठ हजार दुबार नावे
अहमदनगर जिल्ह्यात सहा लाख 99 हजार 436 रेशन कार्ड आहेत. या रेशन कार्ड वरील लाभार्थ्यांमध्ये जवळपास 8 हजार 42 व्यक्तींची नावे दोन-दोन रेशन कार्डवर आहेत. यामुळे आता ही सर्व दुबार नावे रद्द केली जाणार आहेत. अशा दोन-दोन ठिकाणी नावे असलेल्या लोकांचे एक रेशन कार्डमधील नाव कमी केले जाईल आणि एकाच रेशन कार्डचा लाभ अशा व्यक्तीला मिळणार आहे.