Ahmednagar Shirdi News : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये विविध प्रकल्प पूर्णत्वास गेली आहेत. देशाने स्वातंत्र्यानंतर शिक्षण, आरोग्य, पर्यटन, दळणवळण व्यवस्था, उद्योग, कृषी, अध्यात्म अशा विविध क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक प्रगती केली आहे. या प्रगतीचे मोजमाप करणे थोडेसे अशक्य वाटत असले तरी देखील काही उदाहरणांच्या माध्यमातून देशाची प्रगती सहजतेने मोजता येऊ शकते. खरे तर महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत बनवण्यात शासनाला यश आले आहे. अजूनही रस्ते, रेल्वे आणि विमान वाहतूकीचे अनेक प्रकल्प प्रस्तावित आहेत. देशाच्या एकात्मिक विकासासाठी दळणवळण व्यवस्था महत्त्वाची असल्याने हे प्रस्तावित प्रकल्प जलद गतीने पूर्ण व्हावेत यासाठी शासन आणि प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी या प्रमुख तीर्थक्षेत्रात देखील विकासाला चालना मिळालेली आहे. शिर्डी हे भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. येथे दररोज 80 हजाराहून अधिक भाविक दर्शनासाठी येत असतात. विशेष म्हणजे सनासुदीच्या दिवसांमध्ये ही संख्या लाखात जाते. मात्र एक काळ असाही होता जेव्हा शिर्डीत साई बाबांच्या दर्शनासाठी अवघे बोटावर मोजण्याइतके भाविक दाखल होत असत. मात्र गेल्या साडेसात दशकांच्या काळात शिर्डीमध्ये भाविकांची वाढणारी गर्दी, रुग्ण सेवा, शिक्षण, प्रसादालय इत्यादींचा वाढता आलेख हा थक्क करणारा आहे. एक काळ असा होता की शिर्डीत दळणवळणासाठी घोडा गाडी हा एकमेव पर्याय होता.
आता मात्र शिर्डीत आंतरराष्ट्रीय विमानतळ तयार झाले आहे. एवढेच नाही तर शिर्डीत असे काही प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत ज्यामुळे शिर्डी हे आंतरराष्ट्रीय पर्यटनाचे केंद्र बनणार असा दावा केला जात आहे. साईबाबांची नगरी या प्रकल्पांमुळे जागतिक दर्जाचे शहर होणार आहे. सध्या शिर्डी शहर रेल्वे मार्गाने देशातील कानाकोपऱ्यातील शहरांसोबत जोडले गेले आहे. शिर्डीला मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाची भेट मिळालेली आहे. याशिवाय लवकरच येथून ग्रीनफिल्ड महामार्ग जाणार आहे. शिर्डी ते मुंबई दरम्यान बुलेट ट्रेन देखील प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामुळे शिर्डी हे एक प्रमुख धार्मिक पर्यटनाचे केंद्र बनणार आहे. एवढेच नाही तर हे प्रकल्प साईबाबांच्या नगरीला विकासाचे प्रमुख केंद्र बनवतील अशी आशा आहे.
शिर्डीच्या विकासाची वाटचाल
1935 च्या सुमारास म्हणजेच स्वातंत्र्यपूर्वी शिर्डी येथील मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकी होती. दैनंदिन दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या 100 पेक्षा कमी होती. त्यावेळी दानपेटीत अवघे पंधरा ते वीस रुपये जमा होत असत. यामुळे त्यावेळी साई संस्थानला निधी उभा करण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागली. पुरेसा पैसा नसल्याने साई संस्थानला सभामंडपाचे काम कित्येक वेळा बंद पाडावे लागले. मात्र, भूतकाळातील ही परिस्थिती आता वर्तमानात कोणाला सांगितली तर त्याच्यावर विश्वास ठेवणे अशक्य होणार आहे. कारण की साईनगरी शिर्डीत आता दैनंदिन भाविकांची संख्या 80 हजाराच्या घरात आहे.
जेव्हा सुट्टीचे दिवस असतात किंवा सणासुदीचे दिवस असतात तेव्हा ही भाविकांची संख्या लाखावर जाते. विशेष म्हणजे 1935 मध्ये दानपेटीत अवघे 15 ते 20 रुपये जमा होत होते आता मात्र संस्थानला विविध मार्गांनी दररोज एक कोटीच्या आसपास दान मिळते. यातून शिर्डी संस्थानने विविध विकास कामे पूर्ण केली आहेत. आता मंदिरात भाविकांना सुलभतेने दर्शन घेता यावे यासाठी 112 कोटी रुपये खर्च करून दर्शन रांग तयार करण्यात आली आहे.खरे तर या विकासाची सुरुवात स्वातंत्र्यानंतर झाली. देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि साईनगरी शिर्डीचा विकास सुरू झाला. 1947 मध्ये समाधी मंदिराच्या समोर दोन लाकडी इमारती उभ्या झाल्या.
1948 मध्ये शिर्डीत दवाखान्याची सुरुवात झाली. 1951 मध्ये मंदिरात सभा मंडपाचे काम पूर्ण झाले. सभामंडप तयार करताना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागला मात्र अखेरकार संस्थानच्या शर्तीच्या प्रयत्नांतून सभामंडपाची निर्मिती झाली. त्याचं वेळी शिर्डीत पिलग्रीम कॉटेज म्हणजेच गुरुस्थान तयार झाले. आता भक्ती निवासांची संख्या अर्धा डझनपेक्षा अधिक बनली आहे. यामध्ये 2800 खोल्या आहेत. एवढेच नाही तर शिर्डी व आजूबाजूच्या परिसरात भाविकांसाठी राहण्यास वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. शहरात हॉटेल, लॉजिंग मोठ्या प्रमाणात तयार झालेले आहेत. शहराच्या विकासासाठी रस्त्यांचे अनेक प्रकल्प पूर्ण झाले आहेत.
यामुळे दळणवळण व्यवस्था मजबूत झाली आहे. शिक्षण संकुल व दर्शन रांग प्रकल्प यांसारखे महत्त्वाचे काम झाले आहे. पाणी योजना, भुयारी गटार योजना यामुळे शिर्डीचे रूपडे बदलले आहे. राज्याचे वर्तमान महसूल मंत्री तसेच शिर्डीचे लोकप्रतिनिधी राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीच्या विकासात मोलाचे योगदान दिलेले आहे. गेल्या 30 वर्षांच्या काळात पाटील यांनी शिर्डीच्या विकासासाठी शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे शिर्डीच्या विकासात मोठी भर पडली आहे. लोकप्रतिनिधी होते तेव्हाही पाटील यांनी विशेष काम केले. आता ते राज्याचे महसूल मंत्री आहेत, मात्र असे असले तरी त्यांचे शिर्डीवरील प्रेम किंचितही कमी झालेले नाही. याउलट महसूल मंत्री झाल्यानंतर त्यांनी शिर्डीमध्ये वेगवेगळी कामे पूर्ण केली आहेत.
महसूल मंत्री झाल्यानंतर अवघ्या एका वर्षाच्या काळात विखे पाटील यांनी शिर्डी मध्ये पशुवैद्यकीय महाविद्यालय, अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय, शिर्डी नगरपालिका मार्फत आंतरराष्ट्रीय गार्डन प्रकल्पाला मान्यता, शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा, नवीन टर्मिनल साठी 650 कोटी रुपयांचा निधी, शेती महामंडळाच्या जागेवर औद्योगिक वसाहतीला मान्यता इत्यादी कामे केली आहेत. यामुळे शिर्डीचा एकात्मिक विकास सुनिश्चित होणार आहे. शिर्डीत आधी पंचायत होती, त्यानंतर नगरपंचायत बनली आणि मग नगरपालिका बनवण्यात आली. शिर्डीची लोकसंख्या 1951 मध्ये 2950 एवढी होती मात्र यानंतर ही लोकसंख्या झपाट्याने वाढली आणि आता शिर्डीची लोकसंख्या 40 हजाराच्या घरात पोहोचली आहे.
1948 मध्ये येथे होमिओपॅथीचा छोटासा दवाखाना सुरु झाला. आता मात्र शिर्डीत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बनवण्यात आले आहे. येथे दरवर्षी आठ ते दहा लाख रुग्णांवर उपचार होत आहेत. गरिबांवर मोफत उपचार देखील केले जात आहेत. इतरांकडूनही नाममात्र पैसे घेऊन इलाज केले जात आहेत. शैक्षणिक विकासाबाबत बोलायचं झालं तर शिर्डीत 1881 मध्ये पहिली प्राथमिक शाळा सुरू झाली. मात्र माध्यमिक शाळा सुरू होण्यासाठी 1956 चे साल उजाडले. यानंतर मात्र शिर्डीचा शैक्षणिक क्षेत्रात वर्षानुवर्ष विकास होत राहिला. सध्या शिर्डीत लहान मोठ्या 23 शाळा आहेत. नुकतेच 160 कोटी रुपयांचे शैक्षणिक संकुल देखील शिर्डीत तयार झाले आहे. साई संस्थानाने दर्शनासाठी आलेल्या भाविकांकरिता शिर्डीमध्ये प्रसादालय तयार केले आहे. हे प्रसादालय आशिया खंडातील सर्वात मोठे प्रसादालय आहे.
शिर्डी-मुंबई प्रवास फक्त एका तासात
शिर्डी शहरात विकासाची अनेक कामे पूर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे येत्या काही वर्षात शिर्डीत बुलेट ट्रेन देखील धावणार आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे मुंबई ते शिर्डी हा प्रवास फक्त एका तासात आणि शिर्डी ते तिरुपती हा प्रवास फक्त आणि फक्त दहा तासात पूर्ण होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. सध्या शिर्डी ते तिरुपती हा प्रवास पूर्ण करण्यासाठी 18 तास लागतात. आता मात्र हा प्रवास फक्त आणि फक्त दहा तासात पूर्ण होणार अशी आशा आहे. ग्रीन फील्ड हायवेमुळे हे शक्य होणार असून यासाठी आणखी पाच वर्षांचा काळ जाऊ द्यावा लागणार आहे. समृद्धी महामार्गामुळे शिर्डी ते मुंबई हा प्रवास फक्त अडीच तासावर आला आहे मात्र बुलेट ट्रेन जेव्हा सुरू होईल तेव्हा हा प्रवास एका तासावर येणार आहे.