Ahmednagar Successful Farmer : शेतीचा व्यवसाय अलीकडे मोठा आव्हानात्मक बनला आहे. हवामानात होत असलेल्या बदलांमुळे शेतीमधून अनेकदा अपेक्षित अशी कमाई होत नाही. हे वास्तव आहे. मात्र असे असेल तरी निसर्गाशी दोन हात करून बळीराजा नेहमीच झगडत असतो आणि शेतीचा व्यवसाय कितीही आव्हानात्मक बनला तरीही तो व्यवसाय सोडत नाही, काळ्या आईची सेवा सोडत नाही.
शेतकऱ्यांच्या याच लढाऊ बाण्याला अनेकदा नशिबाची साथ मिळते आणि निसर्ग कितीही विरोधात गेला तरीही शेतकरी बांधव शेतीतून चांगली कमाई करून दाखवतो. अहमदनगर जिल्ह्यातून असेच एक उदाहरण समोर आले आहे.
येथील शेतकऱ्याने देखील हवामान बदलाचा सामना करत शेतीमधून लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे. जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्याच्या एका युवा शेतकऱ्याने आपल्या नापीक जमिनीतून लाखो रुपयांची कमाई केली आहे.
तालुक्यातील उक्कडगाव येथील युवा शेतकरी शंकर निकम यांनी ही किमया साधली आहे. निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी दोन रुपये 60 पैसे प्रमाणे कलिंगडची रोपे मागवलीत. 30 गुंठ्यात त्यांनी 5400 रोपांची लागवड केली.
यावर्षी पाण्याचे संकट पाहता त्यांनी कमी पाण्यात अधिक उत्पादन मिळायला पाहिजे या अनुषंगाने ड्रिपचा वापर केला. ठिबक सिंचनाच्या माध्यमातून त्यांनी पाण्याचे व्यवस्थापन केले तसेच काही विद्राव्य खते देखील ठिबक सिंचनातून पिकाला दिली.
काही औषधांची फवारणी केली. योग्य नियोजन केल्यामुळे दोन महिन्यात म्हणजेच 60 दिवसात कलिंगड पीक हार्वेस्टिंग साठी तयार झाले. त्यांना या 30 गुंठ्यातून 23 टन एवढे कलिंगडचे उत्पादन मिळाले.
प्रति किलो साडेबारा रुपये या बाजारभावात या कलिंगडची विक्री त्यांनी केली. यातून त्यांना दोन लाख 72 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले असून खर्च वजा जाता त्यांना एक लाख 80 हजार रुपयांचा निव्वळ नफा राहिला आहे.
विशेष म्हणजे त्यांनी उत्पादित केलेले कलिंगड खूपच चांगले दर्जाचे असल्याने या कलिंगडची विक्री पश्चिम बंगाल या राज्यात केली जात आहे.
एकीकडे, नैसर्गिक संकटांमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. दुसरीकडे बाजारात शेतमालाला अपेक्षित असा भावही मिळत नाहीये.
त्यामुळे शेतकरी बांधव दुहेरी संकटात सापडले आहेत. मात्र या संकटाच्या काळातही या युवा शेतकऱ्याने शेतीमधून चांगले उत्पादन मिळवले आहे. त्यामुळे या युवा शेतकऱ्याचे उदाहरण इतरांना प्रेरणा देणारे ठरणार आहे.