Anandacha Shidha Maharashtra : महाराष्ट्र राज्य शासनाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्यभरातील नागरिकांचा गौरी-गणपतीचा आणि दिवाळीचा सण गोड करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने गौरी गणपती आणि दिवाळीच्या सणाला शंभर रुपयात आनंदाचा शिधा वितरित करण्याचे जाहीर केले आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे की, महाराष्ट्र राज्य शासनाने गेल्या वर्षी दिवाळीच्या सणाचे औचित्य साधून आनंदाचा शिधा वाटप केला होता. याशिवाय गेल्या वर्षी गुढीपाडव्याच्या सणाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने देखील आनंदाचा शिधा वितरित करण्यात आला होता.
सरकारने गेल्या वर्षी घेतलेला हा निर्णय सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठा फायदेशीर ठरला. राज्यातील गोरगरीब जनतेने सरकारच्या या निर्णयाचे तोंड भरून कौतुक केले. या निर्णयामुळे गोरगरिबांचा सण गोड झाला म्हणून अनेक तज्ञांनी देखील सरकारने घेतलेला हा निर्णय राज्यातील जनतेसाठी खूपच फायद्याचा असल्याचे मत नमूद केले.
दरम्यान गेल्या वर्षीचे कोड-कौतुक पाहता राज्य शासनाने याही वर्षी शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्याचे जाहीर केले आहे. यावर्षी गौरी गणपतीच्या सणाला आणि दिवाळीच्या सणाला 100 रुपयात रवा, साखर, चणाडाळ, पामतेल अशा वस्तू असलेला आनंदाचा शिधा देण्याचे जाहीर केले आहे.
विशेष म्हणजे शासनाच्या या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. हा आनंदाचा शिधा पुणे जिल्ह्यात वितरित करण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये शिधावाटप सुरू झाले आहे. जिल्ह्यातील ज्या चार तालुक्यांमध्ये आनंदाचा शिधा पोहोचला आहे त्या ठिकाणी याचे वाटप केले जात आहे.
आतापर्यंत एकवीस हजार शिधापत्रिका धारकांना याचे वाटप पूर्ण झाले आहे. जिल्ह्याचे पुरवठा अधिकारी डॉक्टर सीमा होळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील एकूण पाच लाख 74 हजार शिधापत्रिका धारकांना याचा लाभ मिळणार आहे. सध्या स्थितीला चार तालुक्यात या शिधा वाटपाचे काम सुरू आहे.
उर्वरित तालुक्यातही लवकरच याचे वाटप केले जाणार आहे. हा आनंदाचा शिधा एक ते 30 सप्टेंबर या कालावधीत वाटप केला जाणार आहे. यामुळे उर्वरित शिधापत्रिकाधारकांना देखील लवकरच याचा लाभ मिळेल असे सांगितले जात आहे.