Anganwadi Sevika : राज्य शासनाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. खरेतर, कालपासून अर्थातच 26 फेब्रुवारी 2024 पासून विधिमंडळात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. दरम्यान आज वित्तमंत्री अजित पवार विधिमंडळात अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
आज, 27 फेब्रुवारी 2024 ला दुपारी दोन वाजता वित्तमंत्री अजित दादा राज्याचा अंतरीम अर्थसंकल्प सादर केला आहे.
यापूर्वीच मात्र राज्यातील अंगणवाडी सेविकांसाठी राज्य शासनाने एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार राज्यातील अंगणवाडी सेविकांना एक रकमी एक लाख रुपयांपर्यंतचा लाभ पुरवला जाणार आहे. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे, राज्यातील अंगणवाडी सेविकांना एक लाख रुपये आणि मिनी अंगणवाडी सेविका यांना प्रत्येकी 75000 पर्यंत चा लाभ मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील सेवानिवृत्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना, राजीनामा किंवा मृत्यू आणि सेवेतून काढून टाकलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळणार आहे.
१ एप्रिल, २०२२ पासून ते त्यांना ग्रॅच्युईटी लागू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय होईपर्यंतच्या कालावधीमध्ये सेवानिवृत्ती, राजीनामा, मृत्यू आणि सेवेतून काढून टाकणे इ. प्रकरणी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासनामार्फत हा एकरकमी लाभ दिला जाणार आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाकडून हा लाभ दिला जाणार असून नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. विशेष म्हणजे यासाठीच्या खर्चात देखील राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे.
तथापि, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी लागू करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय भविष्यात घेतल्यास त्या शासन निर्णयाच्या दिनांकापासून एकरकमी लाभाची योजना बंद करण्यात येणार आहे. एकंदरीत, राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील अंगणवाडी सेविकांना मोठा लाभ मिळणार आहे.
दरम्यान राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयाचा सध्या स्थितीला राज्यातील पाच हजार 605 अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना लाभ मिळणार आहे. निश्चितच या निर्णयामुळे या संबंधित अंगणवाडी सेविकांच्या कुटुंबांना मोठा हातभार लागणार आहे.