Annapurna Yojana : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मोठी चर्चा सुरू आहे. या योजनेचे अर्ज भरण्यासाठी महिलांची मोठी धावपळ होत आहे. कारण की आता अर्ज सादर करण्यासाठी फक्त एक महिना उरला आहे. आतापर्यंत जवळपास दीड कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला असावा असा एक अंदाज समोर आला आहे.
दरम्यान आता लाडकी बहीण योजनेनंतर महाराष्ट्रात आणखी एका मोठ्या योजनेची सुरुवात झाली आहे. या योजनेचा लाभ लाडक्या बहिणींना देखील मिळणार आहे. राज्यात आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू झाली आहे.
याच्या माध्यमातून पात्र कुटुंबांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय काल अर्थातच 30 जुलै 2024 ला महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आला आहे.
सदर शासन निर्णयानुसार राज्यातील उज्वला योजनेच्या 52 लाखाहून अधिक महिलांना आणि ज्या महिला लाडक्या बहिणीसाठी पात्र ठरतील त्या महिलांच्या कुटुंबांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. दरम्यान आता आपण या योजनेचे सर्व निकष, अटी अन पात्रता याविषयी अगदी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
काय आहेत अटी ?
या योजनेचा लाभ राज्यातील उज्वला योजनेच्या आणि मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलेच्या कुटुंबाला मिळणार आहे.
याचा लाभ मिळवण्यासाठी महिलेच्या नावाने गॅस कनेक्शन असणे आवश्यक राहणार आहे.
विशेष बाब अशी की एका कुटुंबातील रेशन कार्ड नुसार एक लाभार्थी यासाठी पात्र ठरणार आहे.
या योजनेचा लाभ फक्त घरगुती गॅस म्हणजे 14.2 किलो वजनी गॅस जोडणी असणाऱ्या ग्राहकांना मिळणार आहे.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे याचा लाभ एक जुलै 2024 पूर्वी रेशन कार्ड बनवलेल्या पात्र महिलांनाच दिला जाणार आहे. ज्यांनी 01 जुलै 2024 नंतर रेशन कार्ड काढलेले असेल तर असे रेशन कार्ड यासाठी अपात्र राहणार आहे.
या योजनेअंतर्गत एका महिन्यात फक्त एकच गॅस सिलेंडर मोफत मिळू शकणार आहे आणि एका वर्षाला फक्त तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे.
लाभ कसा मिळणार
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्राकडून तीनशे रुपये अनुदान मिळते. हे अनुदानाचे पैसे लाभार्थ्याच्या बँक खात्यात क्रेडिट केले जातात. आता राज्य शासनाच्या माध्यमातून एका वर्षात 3 सिलेंडर साठी उर्वरित 530 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.
दुसरीकडे लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांना एका वर्षात तीन गॅस सिलेंडरचे पैसे थेट बँक खात्यात दिले जाणार आहेत. प्रति सिलेंडर 830 रुपये प्रमाणे ही रक्कम थेट सदर पात्र महिलेच्या बँक खात्यात जमा होणार आहे.