Bank Cheque : अलीकडे पैशांचे व्यवहार करण्यासाठी ऑनलाइन पेमेंटला विशेष महत्त्व आले आहे. यूपीआय आयडीचा वापर करून आता डिजिटल पेमेंट केले जात आहे. यासाठी बाजारात वेगवेगळ्या डिजिटल पेमेंट एप्लीकेशन देखील आल्या आहेत. फोन पे, गुगल पे, ॲमेझॉन पे अशा अशा वेगवेगळ्या एप्लीकेशन सध्या बाजारात आहेत.
या एप्लीकेशनच्या वापरामुळे पैशांचे व्यवहार आधीच्या तुलनेत निश्चितच सुलभ झाले आहेत यात शंकाच नाही. मात्र असे असले तरी देशात धनादेश म्हणजेच चेकचा वापर कमी झालाय असे नाही.
आजही अनेक ठिकाणी चेकने पेमेंट केले जात आहे. अनेकजण आवर्जून चेकने पेमेंट स्वीकारतात. जर मोठी रक्कम द्यायची असेल तर आजही चेकनेच रक्कम दिली जाते.
दरम्यान, आज आपण बँकेच्या चेकसंदर्भात असणारा एक अतिशय महत्त्वाचा नियम थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
खरेतर काही लोक चेक देतांना चेकच्या डाव्या बाजूला दोन तिरक्या रेषा मारतात. अनेकदा चेकमध्ये असणारा संपूर्ण तपशील म्हणजेच रक्कम, कोणाला रक्कम द्यायची, तारीख, सही इत्यादी तपशील भरल्यानंतर चेक देणारा चेकच्या डाव्या बाजूला दोन तिरक्या रेषा मारतो.
अशा परिस्थितीत, या दोन तिरक्या रेषा का मारल्या जातात? या तिरक्या रेषांचे बँकेच्या भाषेत काय महत्त्व आहे, असे केल्याने काय होते असा सवाल अनेकांना पडलेला आहे. जर चेकवर अशा दोन तिरक्या रेषा मारल्या तर अशा चेकला क्रॉस चेक म्हणून ओळखल जात.
आता क्रॉस चेक दिल्याने काय होते तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, क्रॉस चेक दिल्याने ज्या व्यक्तीच्या नावावर हा चेक देण्यात आला आहे त्याच व्यक्तीच्या नावावर चेकमध्ये नमूद करण्यात आलेली रक्कम जमा होत असते.
या चेकच्या थेट माध्यमातून पैसे काढता येत नाही. म्हणजेच असा चेक थेट बँकेत देऊन रक्कम काढता येऊ शकत नाही. असा चेक प्रामुख्याने मोठ्या रकमेसाठी वापरला जातो.
म्हणजेच हा चेक ज्या व्यक्तीला दिलेला असतो सर्वप्रथम त्या व्यक्तीच्या खात्यात पैसे डिपॉझिट होतात आणि त्यानंतर मग त्या व्यक्तीला हे पैसे बँकेतून काढता येऊ शकतात.
एकंदरीत चेकवर मारण्यात आलेल्या या तिरक्या रेषा खूपच महत्त्वाच्या असून जर एखाद्या व्यक्तीला मोठे पेमेंट करायचे असेल आणि ते पेमेंट दुसऱ्या व्यक्तीच्या बँक खात्यात ट्रान्सफर करायचे असेल तर क्रॉस चेकचा वापर केला पाहिजे. असे केल्यास पैसे सुरक्षितपणे दुसऱ्या व्यक्तीच्या अकाउंट मध्ये जातील यामुळे फसवणूक होण्याची शक्यता कमी होते.