Banking News : आरबीआयने गेल्या महिन्यात दोन बँकांचे लायसन्स रद्द केले होते. तसेच या जुलै महिन्यातही आरबीआयने देशातील आणखी एका बड्या सहकारी बँकेचे लायसन्स रद्द केले. यामुळे बँकिंग सेक्टरमध्ये मोठी खळबळ माजली असून संबंधित बँकेतील ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
गेल्या महिन्यात म्हणजेच जून महिन्यात आरबीआयने उत्तर प्रदेश येथील गाजीपुरमधील पूर्वांचल सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला. यानंतर महाराष्ट्रातील मुंबई येथे स्थित सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द करण्यात आला.
दरम्यान या चालू महिन्यात भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मर्कटाइल सहकारी बँक वाराणसीचं लायसन्स रद्द केले आहे. चार जुलैपासून या बँकेचे लायसन रद्द झाले आहे. आता या तिन्ही बँकांना बँकिंग व्यवसाय करता येणार नाही.
या तीन सहकारी क्षेत्रातील बड्या बँकांचा परवाना रद्द केल्यानंतर आता आरबीआयने पंजाब नॅशनल बँकेवर मोठी कारवाई केली आहे. आरबीआयने शुक्रवारी याबाबत एक पत्रक जारी केले आहे.
यात असे सांगितले आहे की, पंजाब नॅशनल बँकेला (PNB) ‘नो युवर कस्टमर’ (KYC) आणि ‘कर्ज आणि ॲडव्हान्स’शी संबंधित काही निर्देशांचे पालन न केल्याबद्दल 1.31 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
RBI ने या पत्रकात पुढे असे म्हटले आहे की, त्यांनी 31 मार्च 2022 पर्यंत बँकेच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात वैधानिक तपासणी केली होती. त्यानंतर बँकेला नोटीस बजावण्यात आली होती.
नोटीसला बँकेच्या प्रतिसादाचा विचार केल्यानंतर, RBI ने निरीक्षण केले की PNB ने दोन राज्य सरकारच्या मालकीच्या कॉर्पोरेशनना सबसिडी/परतावा/परतपूर्तीच्या मार्गाने सरकारकडून मिळालेल्या रकमेवर कार्यरत भांडवल मागणी कर्ज मंजूर केले होते.
यामुळे पंजाब नॅशनल बँकेवर आरबीआयने ही दंडात्मक कारवाई केली आहे. यानुसार आता पीएनबीला 1.31 कोटी रुपये दंड म्हणून आरबीआयला द्यावे लागणार आहेत. पण या दंडात्मक कारवाईनंतर पंजाब नॅशनल बँकेच्या ठेवीदारांमध्ये थोडेसे संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे.
या कारवाईचा त्यांच्यावर काय परिणाम होणार याबाबत त्यांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की आरबीआय ने केलेल्या या दंडात्मक कारवाईमुळे सदर बॅंकेच्या खातेधारकांवर कोणताच विपरीत परिणाम होणार नाही.
दंडाची रक्कम बँकेकडून वसूल केली जाणार आहे ग्राहकांकडून दंडाची रक्कम वसूल होणार नाही. यामुळे पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांनी घाबरून जाण्याचे काहीही कारण नसल्याचे जाणकार लोकांनी स्पष्ट केले आहे.