Banking News : गेल्या काही महिन्यांमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने देशातील अनेक बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. एसबीआय, एचडीएफसी यांसारख्या नॅशनल बँकांवर देखील दंडात्मक कारवाई झाली आहे. विशेष म्हणजे मध्यवर्ती बँकेने देशातील काही बँकांचे परवाने देखील रद्द केले आहेत. फक्त बँकांवरच नाही तर अनेक एनबीएफसीला देखील दंडात्मक कारवाईचा सामना करावा लागला आहे.
यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील बँकांचा देखील समावेश होतो. अशातच आता आरबीआयने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार काल अर्थातच 23 एप्रिल 2024 ला राज्यातील एका बड्या सहकारी बँकेवर कठोर कारवाई करण्यात आली आहे.
उल्हासनगर येथील कोणार्क अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर RBI ने काल मोठी कारवाई केली आहे. या बँकेवर काही निर्बंध लावले गेले आहेत. यानुसार आता या बँकेतील ठेवीदारांना बँकेतून पैसे काढता येणार नाहीयेत.
यामुळे सदर सहकारी बँकेच्या खातेधारकांमध्ये मोठे भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. मध्यवर्ती बँकेने सदर बँकेवर अनेक निर्बंध लादले आहेत. बँकेची बिकट आर्थिक स्थिती पाहता बँकेवर हे निर्बंध लादण्यात आले असल्याचे आरबीआयने आपल्या सर्क्युलर मध्ये स्पष्ट केले आहे.
पण, डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून पात्र ठेवीदारांना त्यांच्या ठेवींमधून पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेव विमा दाव्याची रक्कम प्राप्त करण्याचा अधिकार राहणार आहे.
विशेष म्हणजे आता उल्हासनगर येथील कोणार्क अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला कोणत्याही प्रकारचे कर्ज आणि अग्रीम मंजूर करता येणार नाही किंवा त्याचे नूतनीकरण करता येणार नाही.
या लादलेल्या निर्बंधांमुळे बँक कोणतेही कर्ज आणि अग्रिम मंजूर किंवा नूतनीकरण करू शकत नाही, कोणतीही गुंतवणूक करू शकत नाही, कोणतेही दायित्व हस्तांतरित करू शकत नाही किंवा आरबीआयच्या परवानगीशिवाय त्याच्या कोणत्याही मालमत्तेची विल्हेवाट लावू शकत नाही.
मात्र या बँकेला कर्ज समायोजित करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तथापि या निर्बंधामुळे या बँकेचे लायसन्स अर्थातच परवाना रद्द झाला आहे असे समजू नये असेही रिझर्व बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान जोपर्यंत बँकेची आर्थिक स्थिती सुधारत नाही तोपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत. बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत बँक या आरबीआयने लादलेल्या निर्बंधांसह बँकिंग ऑपरेशन्स सुरू ठेवणार आहे. एकंदरीत आरबीआयने या बँकेचे लायसन्स रद्द केलेले नाही.
मात्र बँकेची आर्थिक स्थिती डबघाईला जात असल्याचे निदर्शनास आले असल्याने मध्यवर्ती बँकेने या बँकेवर हे निर्बंध लावले आहेत. या निर्बंधामुळे मात्र बँकेचे ग्राहक चिंतेत आहेत. आगामी काळात बँकेचे लायसन्स रद्द होणार की काय अशी भीती आता ग्राहकांना सतावत आहे.