Banking News : अलीकडे जवळपास प्रत्येकाचेच बँकेत खाते आहे. काही लोकांचे तर एकापेक्षा अधिक बँक खाती आहेत. दरम्यान जर तुमचेही बँकेत अकाउंट असेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास राहणार आहे. खरेतर मेहनतीने कमावलेले पैसे सुरक्षित रहावे यासाठी अनेकजण बँकेत पैसे ठेवत असतात.
पण, काही कारणास्तव बँक बुडते, आरबीआय कडून बँकेचे लायसन्स रद्द केले जाते. अशावेळी बँकेत जमा असलेल्या पैशांचे काय होते, खातेधारकांचे पैसे पण बुडतात का हा सवाल अनेकांच्या माध्यमातून उपस्थित केला जात होता.
अशा परिस्थितीत आज आपण जर आरबीआयने एखाद्या बँकेचे लायसन्स रद्द केले किंवा बँक बंद पडली तर सदर बँकेत ठेवलेल्या खातेधारकांच्या पैशांचे काय होते ? बंद पडलेल्या बँकेतील खातेधारकांना किती पैसे मिळू शकतात ? याबाबत आरबीआयचा नियम काय सांगतो याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
बँक बुडाली तर किती पैसे मिळतात
मिळालेल्या माहितीनुसार, जर एखादी बँक डिफॉल्ट झाली किंवा दिवाळखोर झाली, तर अशावेळी बँकेत जमा केलेल्या बँक ग्राहकांच्या रकमेवर 5 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळते. म्हणजेच सदर बँकेतील खातेधारकाला पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळते.
ही रक्कम सदर दिवाळखोर झालेल्या बँकेतील खातेधारकांना ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन म्हणजे DICGC द्वारे दिली जाते. DICGC ही रिझर्व्ह बँकेची पूर्ण मालकीची कंपनी आहे. DICGC देशातील बँकांचा विमा उतरवते.
दरम्यान याच विमा अंतर्गत जर एखादी बँक बुडाली तर त्या बँकेतील खातेधारकांचे पाच लाखांपर्यंतची रक्कम दिले जात असते. खरेतर आधी बँक बुडल्यास किंवा दिवाळखोर झाल्यास 1 लाख रुपयांपर्यंतची रक्कम दिली जात होती, मात्र सरकारने ती वाढवून 5 लाख रुपये केली आहे.
विशेष म्हणजे या अंतर्गत देशातील सर्वच बँका अगदी ज्या विदेशी बँकांच्या भारतात शाखा आहेत त्याही बँकांच्या खातेधारकांना या अंतर्गत बँक बुडाली तर रक्कम दिली जाते. दरम्यान बँक बुडाल्यानंतर तीन महिन्यांच्या कालावधीत म्हणजेच 90 दिवसाच्या कालावधीत संबंधित बँकेतील खातेधारकांना पाच लाखांपर्यंतची रक्कम वितरित केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
जर एखाद्या व्यक्तीचे दोन बँकेत दोन खाते असतील आणि दोन्ही बँका बुडाले असतील तर अशा व्यक्तीला दोन्ही बँकांकडून पाच-पाच लाख रुपये म्हणजेच एकूण दहा लाख रुपये मिळतील.
मात्र जर एका व्यक्तीचे एका बँकेत दोन खाते असतील तर अशा व्यक्तीला फक्त पाच लाख रुपयांची रक्कम मिळणार आहे. विशेष म्हणजे तुमच्या खात्यात कितीही रक्कम असली तरीदेखील तुम्हाला फक्त पाच लाख रुपयांपर्यंतचीचं रक्कम बँक बुडाल्यानंतर मिळणार आहे.
म्हणजेच जर तुमची बँक बुडाली आणि तुमच्या खात्यात दोन लाख रुपये असतील तर तुम्हाला या कायद्याअंतर्गत दोन लाख रुपये मिळतील. पण जर अशा बँकेत तुमचे दहा लाख रुपये असतील तर तुम्हाला फक्त 5 लाख रुपयेचं या अंतर्गत मिळू शकणार आहेत.