Business Idea : केंद्र शासनाकडून वाढते प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. प्रदूषणावर आळा बसवण्यासाठी प्लास्टिक बँन करण्यात आले आहे. एकल वापराच्या म्हणजेच सिंगल युज प्लास्टिकला आता हद्दपार करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
यामुळे सिंगल युज प्लास्टिक वापरण्यास आता भारतात बंदी आहे. यामुळे सध्या देशात सिंगल युज प्लास्टिकला पर्याय म्हणून कार्डबोर्डच्या पेट्यांचा वापर वाढला आहे. याचा वापर उत्पादनांचा पुरवठा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. कार्डबोर्ड अर्थातच पुठ्ठ्यांच्या कार्टन बॉक्स चा व्यवसाय चांगलाच तेजीत आला आहे. खरतर हा व्यवसाय फार पूर्वीपासून तेजीत आहे.
मात्र सरकारने सिंगल युज प्लास्टिकवर बंदी लादल्यानंतर हा व्यवसाय आधीच्या तुलनेत अधिक तेजीत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे जर तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही पुठ्ठ्यांचा कार्टन बॉक्स बनवण्याचा व्यवसाय सुरू करून चांगली कमाई करू शकता. खरंतर याचा वापर वेगवेगळ्या क्षेत्रात केला जातो.
पण ऑनलाईन खरेदीमध्ये याचा सर्वाधिक वापर होत असल्याची बाब उघडकीस आली आहे. आता देशात ऑनलाइन खरेदीला अधिक प्राधान्य मिळत आहे. दिवसेंदिवस ऑनलाईन खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे हा कार्टन बॉक्स बनवण्याचा व्यवसाय भविष्यात अजून तेजीत येण्याची शक्यता तज्ञ लोकांच्या माध्यमातून वर्तवण्यात आले आहे.
दरम्यान पुठ्ठ्याच्या निर्मितीशी संबंधित कोणताही व्यवसाय करण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग मध्ये अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आला आहे. या व्यवसायासाठी एमएसएमई नोंदणी करावी लागते. एमएसएमई रजिस्टर व्यवसाय असल्याने यासाठी शासनाकडून मदतही पुरवली जाते.
शासकीय मदत आणि बँकांकडून या व्यवसायासाठी कर्ज मिळते. यामुळे जर कोणाकडे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी अपेक्षित भांडवल नसेल तरीही हा व्यवसाय सुरू केला जाऊ शकतो. मात्र हा व्यवसाय सुरू करण्यासाठी फॅक्टरी लायसन, प्रदूषण विभागाचे प्रमाणपत्र आणि जीएसटी नोंदणीचे प्रमाणपत्र आवश्यक राहते.
व्यवसायासाठी कोणकोणत्या मशीन्स लागतात
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी काही मशीनची आवश्यकता असते. सिंगल फेज पेपर कॉरगेशन मशीन, रील स्टैंडलाईट मॉडेल्स बोर्ड कटर, शीट चिटकवणारे मशीन, शीट प्रेसिंग मशीन यांसारख्या मशीनची या व्यवसायासाठी आवश्यकता असते. याव्यतिरिक्त काही कच्च्या मटेरियलची देखील आवश्यकता असते.
क्राफ्ट पेपर, पिवळा स्ट्रा बोर्ड, डिंक आणि शिलाई तार यांसारख्या वस्तूंची या व्यवसायासाठी गरज असते. या व्यवसायासाठी जवळपास 20 लाख रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. पण वीस लाख रुपये गुंतवणूक या व्यवसायातून महिन्याकाठी 5 ते 6 लाख रुपयांची सहज कमाई होऊ शकते.