Central Government Scheme For Women : गेल्या काही वर्षांमध्ये महिला सक्षमीकरणासाठी शासन आणि प्रशासनाने विशेष प्रयत्न केले आहेत. या प्रयत्नांमुळे महिला वर्ग आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात आघाडी घेत असल्याचे चित्र आहे. शिक्षण, क्रीडा, अध्यात्म, उद्योग, नोकरी, शासकीय सेवा अशा विविध क्षेत्रात महिलांनी आपल्या कार्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
शिक्षणात तर महिलावर्ग हा पुरुषांपेक्षा आघाडीवर आहे. अलीकडे महिलांच्या शिक्षणाची टक्केवारी सुधारली आहे. यासाठी शासनाचे देखील प्रयत्न कामी आले आहेत. शासन नेहमीच महिलांसाठी नवनवीन योजना आणत असते. केंद्रातील सरकारने देशभरातील गरोदर महिलांसाठी अशीच एक नाविन्यपूर्ण योजना सुरु केली आहे.
या अंतर्गत देशातील पात्र गरोदर महिलांना आपल्या अन आपल्या बाळाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हा आर्थिक लाभ दिला जात आहे. मात्र, अनेकांना अजूनही या योजने संदर्भात फारशी माहिती नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, आता आपण या योजनेचे स्वरूप नेमके कसे आहे या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कसे आहे या योजनेचे स्वरूप ?
ही योजना 2017 पासून सुरू आहे. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली असून त्यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेंपैकी एक आहे. या योजनेला पीएम मातृत्व वंदना योजना असे नाव देण्यात आले आहे. या मातृत्व वंदना योजनेअंतर्गत देशभरातील महिलांना आपल्या गरोदर काळात आर्थिक साहाय्य पुरवले जात आहे. या अंतर्गत महिला पहिल्यांदा गरोदर असल्यास पाच हजार रुपये मिळतात.
जर समजा महिला दुसऱ्यांदा गरोदर असेल आणि मुलगी झाली असेल तर अशा महिलेला सहा हजार रुपये मिळतात. दुसऱ्यांदा फक्त मुलगी जन्माला आलेल्या महिलेलाच याचा लाभ मिळतो. म्हणजेच दुसऱ्यांदा मुलगी जन्माला आली तर अशा महिलेला या योजनेचा दोनदा लाभ मिळणार आहे. पण दुसऱ्यांदा मुलगा जन्माला आला तर या योजनेचा लाभ मिळणार नाही.
पहिल्यांदा गरोदर असणाऱ्या महिलेला एकूण दोन टप्प्यात ही रक्कम दिली जाते. पहिल्या हफ्त्यात 3,000 आणि दुसऱ्या हप्त्यात 2 हजार अशी एकूण पाच हजार रुपयाची मदत दिली जाते. पण दुसऱ्यांदा गरोदर झाल्यास अन मुलीला जन्म दिल्यास महिलेला एकाच वेळी सहा हजार रुपयांची भेट मिळते.
कोणाला मिळणार लाभ ?
ही एक केंद्रीय पुरस्कृत योजना आहे म्हणजेच देशातील सर्वच राज्यांमधील महिलांना याचा लाभ घेता येणार आहे. महाराष्ट्रातील महिलांना देखील याचा लाभ मिळतोय. याचा लाभ 8 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना मिळणार आहे.
बीपीएल कार्डधारक महिलांना याचा लाभ मिळणार आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिला सुद्धा यासाठी पात्र ठरतील. याशिवाय, ई-श्रम कार्डधारक, मनरेगा जॉब कार्डधारक, शेतकरी सन्मान निधीच्या लाभार्थी महिलांनाही लाभ दिला जाणार आहे.
कुठं करणार अर्ज ?
पीएम मातृत्व वंदना योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा केंद्रातील सरकारने उपलब्ध करून दिली आहे. https://wcd.delhi.gov.in/wcd/pradhan-mantri-matru-vandana-yojana-pmmvy या अधिकृत संकेतस्थळावर पात्र महिलांना आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करता येणार आहे. अंगणवाडी केंद्रात जाऊन देखील यासाठी अर्ज करता येतो हे विशेष.
ज्या पात्र महिलांना ऑफलाईन अर्ज करायचा असेल त्या महिलांनी https://wcd.nic.in या वेबसाईटवर जाऊन या योजनेचा अर्ज डाऊनलोड करायचा आहे. अर्जाची प्रिंट आऊट घेतल्यानंतर तो अर्ज काळजीपूर्वक भरायचा आहे आणि अर्ज भरल्यानंतर सदर अर्ज अवश्य कागदपत्रांसहित अंगणवाडी केंद्रात जाऊन सादर करायचा आहे.