Maharashtra Rain : महाराष्ट्रात सध्या अनेक ठिकाणी तापमानाने 40°c चा टप्पा पार केला आहे. त्यामुळे तीव्र उन्हाच्या झळा नागरिकांना घामाघूम करत आहेत. 16 मार्च ते 20 मार्च या कालावधीत राज्यात वादळी पाऊस अन गारपीट झाली होती. पण, आता गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान कोरडे झाले आहे.
अनेक ठिकाणी तापमान वाढ देखील पाहायला मिळत आहे. दिवसाचे कमाल तापमान खूपच वाढले आहे. वादळी पावसाचे सावट काहीसं दूर झाल्याचे पाहायला मिळतं असतानाच आता भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा महाराष्ट्रसह देशातील अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे.
येत्या 24 तासात महाराष्ट्रसह देशातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा ईशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची पुन्हा एकदा चिंता वाढवणार असे चित्र आहे. खरंतर नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
रब्बी हंगामातील काढणीयोग्य पिकांना या वादळी पावसाचा फटका बसला. शेतकऱ्यांचे या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. अशातच आता पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे राज्यातील काही भागात गारपीट होणार असा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडणार आहे.
काय म्हणतंय हवामान विभाग
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील पश्चिम बंगाल, सिक्कीम, उत्तर ओडिशा, पूर्व झारखंड, पूर्व विदर्भ, छत्तीसगड आणि अरुणाचल प्रदेशात विजांच्या कडकडाटासह वादळ अन हलका ते मध्यम पाऊस हजेरी लावणार असा अंदाज आहे. तसेच छत्तीसगड, पूर्व झारखंड, पश्चिम बंगाल, पश्चिम आणि उत्तर ओडिशा येथेही ढगांचा गडगडाट पाहायला मिळू शकतो.
महाराष्ट्रबाबत बोलायचं झालं तर राज्यातील चंद्रपूर आणि गडचिरोली येथे वादळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांना विशेष सावध राहण्याची आवश्यकता आहे. पुढील 24 तासात राज्यातील विदर्भ विभागात तसेच छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, गंगेचे पश्चिम बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, आसाम आणि मेघालय या ठिकाणी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
एवढेच नाही तर देशातील काही भागात 26 ते 29 मार्च दरम्यान पावसाचे वातावरण कायम राहणार असे देखील यावेळी आयएमडीने स्पष्ट केले आहे. निश्चितच कडक उन्हाळ्यात पावसाची शक्यता तयार झाली असल्याने उकाड्याने घामाघुम झालेल्या जनतेला यामुळे दिलासा मिळणार आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांचे यामुळे मोठे नुकसान होण्याची भीती आहे.