Cheap Agriculture Land : भारतासह जगातील विविध देशांमध्ये शेती व्यवसाय केला जातो. आपल्या भारतात तर शेती हा मुख्य व्यवसाय आहे. देशातील जवळपास निम्म्याहून अधिक जनसंख्येचे शेतीवर अवलंबित्व आहे. देशातील बहुतांशी लोक प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या शेतीवर तसेच शेतीशी निगडित उद्योग धंद्यांवर अवलंबून आहेत.
मात्र, आपल्याकडे शेत जमिनीचे दर हे खूपच वाढले आहेत. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे वाढती लोकसंख्या, वाढते शहरीकरण, वाढते औद्योगिकीकरण यामुळे शेतजमिन कमी होत चालली आहे. शहरालगत असलेल्या भागाचे शहरीकरण होत असल्याने आणि ग्रामीण भागातही विविध उद्योगधंदे सुरू झाले असल्याने आता जमीन कमी झाली आहे.
याचा परिणाम म्हणून जमिनीचे दर वाढले आहेत. पण जगात असेही अनेक देश आहेत जिथे शेत जमिनीचे दर हे खूपच कमी आहेत. आज आपण अशाच टॉप 10 देशांची माहिती जाणून घेणार आहोत जिथे शेत जमिनीचे दर खूप कमी आहेत. यातील कॅमेरून देशात तर शेत जमिनीचे दर फक्त हेक्टरी 45 हजार रुपये एवढे आहेत.
जगात सर्वात स्वस्त शेत जमीन असलेले टॉप 10 देश
कॅमेरून : सर्वात स्वस्त शेत जमीन असलेल्या टॉप 10 देशांच्या यादीत कॅमेरून हा देश पहिल्या नंबर वर येतो. मिळालेल्या माहितीनुसार, या देशात ४५ हजार रुपये प्रति हेक्टर या बाजारभावात शेतजमीन उपलब्ध होते. आम्ही आपणांस सांगू इच्छितो की, हा देश केळीचा तिसरा, पाम तेलाचा सातवा तर कोको उत्पादनाच्या बाबतीत पाचवा सर्वात मोठा देश म्हणून ओळखला जात आहे.
नायजेरिया : या यादीत हा देश दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. या देशात शेत जमिनीचे भाव हेक्टरी 58 हजार रुपये असे आहेत. हा देश मका, कसावा आणि गिनी कॉर्न यांसारख्या पिकांच्या उत्पादनात आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.
उत्तर स्वीडन : उत्तर स्वीडन जगातील सर्वात स्वस्त शेतजमीन असलेल्या देशांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या देशात हेक्टरी दोन लाख तीस हजार रुपये या बाजारभावात शेतजमीन विक्रीसाठी उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला आहे. या देशात बार्ली आणि ओट सारखी महत्त्वाची पिके घेतली जातात.
दक्षिण आफ्रिका : द्राक्ष उत्पादनाच्या बाबतीत दक्षिण आफ्रिका हा देश चौथ्या क्रमांकावर विराजमान आहे. या देशात तृणधान्याचे देखील मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात आहे. तृणधान्य उत्पादनात हा देश पाचव्या क्रमांकावर येतो. याशिवाय मकां, एरंडेल, नाशपाती यांसारख्या पिकांचे देखील या देशात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात आहे. या देशात दोन लाख 40 हजार रुपये प्रति हेक्टर या बाजारभावात शेतजमिनी उपलब्ध होतात.
उरुग्वे : या देशात दोन लाख 80 हजार प्रति हेक्टर या बाजारभावात शेत जमिनी उपलब्ध होत असल्याचा दावा केला जात आहे. या ठिकाणी नैसर्गिक शेती करण्याला विशेष पसंती दाखवली जाते. जगातील सर्वात स्वस्त शेत जमिन असलेल्या देशांच्या यादीत हा पाचव्या क्रमांकावर आहे.
एस्टोनिया : जगातील सर्वात स्वस्त शेत जमीन असलेल्या टॉप 10 देशांच्या यादीत या देशाचे नाव सहाव्या क्रमांकावर आहे. येथे स्वस्त शेत जमीन उपलब्ध होते. मिळालेल्या माहितीनुसार या देशात तीन लाख पाच हजार रुपये प्रति हेक्टर पासून शेतजमीन उपलब्ध होते.
लॅटव्हिया : या देशात ३ लाख ४५ हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे शेतजमीन मिळते. या देशात 1.7 दशलक्ष हेक्टर एवढी जिराईत शेतजमीन आहे.
लिथुआनिया : या देशात साडेतीन लाख रुपये प्रति हेक्टर प्रमाणे शेत जमीन मिळत आहे. येथे प्रमुख पीक बटाटे आहे. याव्यतिरिक्त इतरही पिकांची शेती येथे कमी अधिक प्रमाणात पाहायला मिळते.
ब्राजील : कृषी उत्पादनाच्या बाबतीत हा देखील एक आघाडीचा देश म्हणून ओळखला जातो. या देशात विविध पिकांची शेती केली जाते. ऊस, संत्रा, कॉफी यांसारख्या विविध पिकांची येथे लागवड होत असून या देशात मात्र साडेतीन लाख रुपये प्रति हेक्टर प्रमाणे शेतजमीन उपलब्ध होत असल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे.
बल्गेरिया : हा देश जगातील सर्वात स्वस्त शेत जमीन असलेल्या टॉप 10 देशांच्या यादीत दहाव्या क्रमांकावर आहे. या देशात फक्त ३ लाख ६० हजार रुपये प्रति हेक्टर या बाजारभावात शेतजमीन मिळत असल्याचा दावा केला जातोय. विशेष बाब म्हणजे हा देश लैव्हेंडर आणि गुलाब तेलाचा सर्वात मोठा उत्पादक आहे. अर्थातच या ठिकाणी लैव्हेंडर आणि गुलाबाची मोठ्या प्रमाणात शेती केली जात आहे.