Cotton Rate : गेल्या हंगामात कापसाने शेतकऱ्यांची पार गोची केली होती. मुहूर्ताचा काही काळ वगळता गेल्या हंगामात कापसाला अपेक्षित असा भाव मिळाला नाही. यामुळे पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे कापूस पीक शेतकऱ्यांसाठी डोईजड ठरले. दरम्यान यावर्षीचा कापूस हंगाम सुरू झाला आहे.
उत्तर भारतातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये नवीन कापसाची आवक होऊ लागली आहे. पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये नवीन कापसाची मोठ्या प्रमाणात आवक नमूद केली जात आहे.
तेलंगाना, आंध्र प्रदेश आणि आपल्या महाराष्ट्रात देखील नव्या कापसाची आवक होत आहे. राज्यातील बहुतांशी भागात शेतकरी बांधव पूर्व हंगामी कापूस लागवड करतात. सध्या या पूर्व हंगामी कपाशीचे उत्पादन बाजारात दाखल होत आहे. खानदेश मधील काही ठिकाणी खेडा खरेदी मध्ये पूर्व हंगामी कपाशी विक्रीचा शुभारंभ करण्यात आला आहे.
मात्र असे असले तरी आपल्या महाराष्ट्रात कापूस खूपच कमी प्रमाणात बाजारात आला आहे. सध्या कापसाची खरी आवक सुरू झाली आहे ती उत्तर भारतातील राज्यांमध्ये. हरियाणा, राजस्थान आणि पंजाब या राज्यांमध्ये कापसाची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे.
विशेष म्हणजे या राज्यांमध्ये विक्रीसाठी दाखल होणाऱ्या नव्या कापसाला अगदी सुरुवातीच्या टप्प्यात चांगला दर मिळत आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पुन्हा एकदा आशा पल्लवीत झाल्या आहेत. सध्या नव्या कापसाला हमीभावापेक्षा जास्तीचा दर मिळत आहे. विशेष म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यातच चांगला दर मिळत असल्याने तसेच यंदा उत्पादनात मोठी घट येणार असा अंदाज असल्याने आगामी काळात देखील बाजारभाव टिकून राहतील असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.
सध्या हरियाणा, पंजाब आणि राजस्थानी उत्तर भारतातील राज्यांमध्ये नव्या कापसाचे व्यवहार ७ हजार ४०० ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान होत आहेत. सरकारने यंदा लांब धाग्याच्या कापसासाठी ७ हजार २० रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे. म्हणजेच सध्या नव्या कापसाला हमीभावापेक्षा चांगला भाव मिळत आहे.
यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये थोडेसे समाधानाचे वातावरण आहे. तसेच भारतासहित प्रमुख कापूस उत्पादक राष्ट्रांमध्ये कापसाचे उत्पादन कमी होणार असल्याचा अंदाज असल्याने आगामी काळात देखील कापसाला चांगला भाव मिळू शकतो असे सांगितले जात आहे. पण सध्या जुना कापूस 7 हजारांदरम्यान विकला जात आहे. देशाच्या इतर भागातही हाच भाव कायम आहे.