Farmer Success Story : गेल्या काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसत आहे. सोबतचं शासनाचे उदासीन धोरण देखील शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेकदा शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित उत्पादन मिळत नाही. जर समजा शेतीमधून निसर्गाचा सामना करून बऱ्यापैकी उत्पादन मिळाले तर बाजारात उत्पादित झालेल्या मालाला अपेक्षित भाव मिळत नाही.
यामुळे शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी होते. मात्र तरीही शेतकरी बांधव हिम्मत न हारता शेती व्यवसायात नवनवीन प्रयोग सुरूच ठेवतात. विशेष म्हणजे या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही वेळा चांगले उत्पन्न देखील मिळते.
असेच एक उत्तम उदाहरण समोर येत आहे ते धारूर तालुक्यातून. तालुक्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने अवघ्या दोन एकर जमिनीतून सात लाख रुपयांची कमाई आणि तीही अवघ्या 40 दिवसांच्या कालावधीत मिळवली आहे.
यामुळे सध्या या प्रयोगशील शेतकऱ्याची पंचक्रोशीत चांगली चर्चा पाहायला मिळत आहे. तालुक्यातील कसबा भागातील नितीन शिनगारे या प्रयोगशील शेतकऱ्याने ही किमया साधली आहे. नितीन यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या तालुक्यात फार पूर्वीपासून पाण्याचा वनवा आहे.
अत्यल्प पाण्यामुळे शेतकऱ्यांना शेती व्यवसाय करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. शाश्वत पाण्याची उपलब्धता असली तर शेतीमधून चांगले उत्पादन मिळवता येते. बारा महिने पीक लागवड करता येते.
मात्र धारूर तालुक्यातील शेतकऱ्यांना आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या पाण्याचे योग्य पद्धतीने नियोजन करून पिक उत्पादन घ्यावे लागत आहे. नितीन यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असणाऱ्या अत्यल्प पाण्याची जाणीव ठेवून त्यांच्याकडील दोन एकर जमिनीवर कोथिंबीर लागवड केली.
दोन एकर जमिनीवर जवळपास 95 किलो धन्याची म्हणजेच कोथिंबीर बियाण्याची पेरणी केली. कोथिंबीर पेरणीनंतर पिकाचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन केले, पाण्याचे योग्य व्यवस्थापन केले यामुळे अवघ्या चाळीस दिवसांच्या कालावधीत त्यांचे पीक रेडी झाले.
दोन एकर जमिनीत पेरलेल्या या कोथिंबीर पिकातून त्यांना तब्बल 65 क्विंटल एवढे दर्जेदार उत्पादन मिळाले. उत्पादित झालेल्या कोथिंबीरला जागेवर 120 रुपये प्रति किलो असा भाव मिळाला.
यामुळे नितीन यांना तब्बल सात लाख रुपयांची कमाई झाली. एकंदरीत शेतीमध्ये काळाच्या ओघात योग्य तो बदल झाला तर शेती व्यवसायातून देखील कमी दिवसात लाखोंची कमाई करता येणे शक्य आहे हेच नितीन यांच्या या प्रयोगातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.