Farmer Success Story : शेतीचा व्यवसाय परवडत नाही, हे आपण नेहमीच ऐकतो. खरेतर शेतीमधून अनेकांना अपेक्षित कमाई होत नाही हे वास्तव आहे. यामुळे अलीकडे अनेक शेतकरी पुत्र शेतीपासून दुरावत चालले आहेत. राब-राब राबूनही पदरी काहीच पडत नाही यामुळे शेती न केलेलीच बरी अशी धारणा आता अनेकांची बनली आहे.
पण असेही काही नवयुवक तरुण आहेत जे की नैसर्गिक संकटांचा आणि सुलतानी संकटांचा सामना करून शेतीमधून चांगली कमाई करत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील मौजे म्हाकवे येथील एका युवा शेतकऱ्याने अवघ्या चार गुंठे जमिनीतून दोन लाखांची कमाई करून दाखवली आहे.
यामुळे सध्या या युवा शेतकऱ्याची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. खरे तर असे अनेक अल्पभूधारक शेतकरी आहेत जे की आपल्याकडे कमी जमीन असल्याने शेतीमधून फारशी कमाई होत नाही असे बोलतात.
पण जर शेतीमध्ये योग्य नियोजन असेल आणि बाजाराचा अभ्यास करून पीक पद्धतीत योग्य तो बदल केला तर कमी जमिनीतूनही चांगली कमाई करता येणे शक्य आहे. हेच म्हाकवे येथील युवा शेतकरी विजयकुमार चंद्रकांत डोंगळे यांनी दाखवून दिले आहे.
विजयकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्यावर्षी त्यांनी त्यांच्या 19 गुंठे खडकाळ माळरान जमिनीवर उसाची लागवड केली होती यातून त्यांनी तब्बल 48 टन उसाचे उत्पादन घेतले. ऊस पिकातून विक्रमी उत्पादन घेतल्यानंतर त्यांनी 10 जानेवारीला काकडीचे बियाणे लावले.
चार गुंठे जमिनीवर त्यांनी काकडीची लागवड केली. यासाठी त्यांनी जमिनीची योग्य मशागत केली. मशागत झाल्यानंतर मल्चिंग पेपर अंथरूण काकडी लागवड केली आणि लागवडीनंतर आळवणी, जैविक बुरशीनाशक फवारणी, किडीसाठी ट्रॅप यांसारख्या उपाययोजना केल्या.
या उपायोजनांमुळे त्यांना काकडीच्या पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळाले आहे. त्यांनी काकडी जवळपासच्या बाजारांमध्येच विकली. पन्नास रुपये ते 80 रुपये प्रति किलो या दरम्यान भाव मिळाला.
दररोज 50 ते 70 किलो काकडीचे उत्पादन त्यांना मिळत असून आत्तापर्यंत दोन लाख रुपयांची काकडी त्यांनी विकली आहे. विशेष म्हणजे काकडीच्या आजूबाजू असलेल्या कुंपणावर त्यांनी दोडक्याचे वेल चढवले होते यातूनही त्यांना चार हजार रुपयांची कमाई झाली आहे.
काकडीच्या पिकासाठी त्यांना मशागती पासून ते काढणीपर्यंत जवळपास पंधरा हजार रुपयांचा खर्च आला आहे. म्हणजे खर्च वजा करूनही त्यांना चांगली कमाई झाली आहे.
पिक पद्धतीत बदल केला बाजारात कोणत्या पिकाला चांगला भाव मिळतो, कोणत्या पिकाला मागणी आहे हे हेरून जर पीक निवडले तर निश्चितच चांगली कमाई होऊ शकते, हेच विजयकुमार यांच्या उदाहरणावरून पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे.