Farmer Success Story : अलीकडे महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात फळ उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. आंबा, काजू, पेरू, सफरचंद, डाळिंब, द्राक्ष यांसारख्या विविध फळ पिकांचे शेतकरी बांधव उत्पादन घेत आहेत. आपल्या राज्यातील शेतकऱ्यांनी फळ पिकांच्या शेतीमधून चांगले उत्पन्न देखील मिळवले आहे.
पारंपारिक पिकांच्या लागवडीतून शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पादन मिळत नसल्याने कृषी क्षेत्रातील तज्ञ लोकांनी देखील शेतकऱ्यांना आता फळबाग शेतीकडे वळण्याचा सल्ला दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी आता फळबाग शेतीकडे आपला मोर्चा वळवला आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातून एका शेतकरी कुटुंबानेही फळ शेतीतून आर्थिक प्रगती साधली आहे.
जिल्ह्यातील संगमनेर तालुक्याच्या आंबीखालसा या छोट्याशा गावातील एका शेतकरी कुटुंबाने आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर पेरूच्या बागेतून लाखो रुपयांचे उत्पन्न करून दाखवले आहे. आयुब, रमजान व मुस्ताक सय्यद या तीन शेतकरी बंधुंनी पेरूच्या फक्त एक एकर जमिनीतून तब्बल पाच लाखांपर्यंतचे उत्पन्न कमवून दाखवले आहे.
विशेष म्हणजे आत्तापर्यंत फक्त दहा टक्के एवढा माल निघाला असून आणखी 90% माल शिल्लक आहे. यामुळे उत्पन्नाचा हा आकडा विक्रमी वाढणार आहे. परिणामी या तिन्ही शेतकरी बंधूंची सध्या पंचक्रोशीत चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे.
केव्हा केली पेरूची लागवड
सय्यद बंधूंनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी तीन वर्षांपूर्वी पेरूची बाग लावली होती. एक एकर जमिनीत तैवान पिंक पेरूची त्यांनी लागवड केली. लागवड केल्यानंतर साधारणतः नऊ महिन्यांनी त्यांना पहिल्यांदा उत्पादन मिळाले. पहिल्या वर्षी त्यांना या एक एकर बागेतून पाच लाखांपर्यंतची कमाई झाली. दुसऱ्या वर्षी मात्र पेरूच्या बागेतून त्यांना फारसे उत्पन्न मिळाले नाही.
मात्र त्यांनी दुसऱ्या वर्षी आलेल्या अपयशातून यशाचा धडा घेतला आणि आता या चालू तिसऱ्या वर्षातून त्यांना चांगले उत्पादन मिळाले आहे. यावर्षी त्यांना आतापर्यंत पेरूच्या बागेतून तीन तोडे उत्पादन मिळाले आहे. सध्या त्यांच्या पेरूला 83 रुपये प्रति किलो एवढा भाव मिळत आहे. यामुळे त्यांना तीन तोड्यातून जवळपास पाच लाखांपर्यंतची कमाई झाली आहे. परंतु बागेत आणखी 90% माल शिल्लक आहे यामुळे उत्पन्नाचा हा आकडा मोठा वाढेल असा अंदाज आहे.
किती खर्च केला ?
सय्यद बंधूंनी सांगितले की, यंदा त्यांना पेरूच्या बागेसाठी साडेचार लाख रुपयांचा खर्च करावा लागला आहे. त्यांनी पेरूंच्या झाडांची छाटणी, खते-औषधे, मजुरी असा एकूण साडेचार लाख रुपयांच्या आसपास खर्च केला आहे. दरम्यान त्यांना आत्तापर्यंत पाच लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.
म्हणजेच पेरू बागेसाठी आलेला सर्व खर्च आता भरून निघाला आहे. आता जो 90% माल शिल्लक आहे तो त्यांचा निव्वळ नफा राहणार आहे. आणखी जवळपास 20 टन एवढा माल बागेत शिल्लक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यामुळे जर बाजारभाव असेच कायम राहिले तर त्यांना पेरूच्या एक एकर बागेतून आणखी पंधरा लाखांपर्यंतचे उत्पन्न मिळेल असे सांगितले जात आहे.