Farmer Success Story : अलीकडे शेतीचा व्यवसाय हा हवामान बदलामुळे मोठा आव्हानात्मक बनला आहे. अवकाळी, अतिवृष्टी, ढगाळ हवामान, गारपीट, दुष्काळ अशा असंख्य संकटांमुळे शेतीमधून आता अपेक्षित कमाई होत नसल्याचे वास्तव आहे. परिणामी अनेकांनी शेतीची साथ सोडली आहे. मात्र या संकटाच्या काळात देखील काही प्रयोगशील शेतकरी बांधव आपल्या नाविन्यपूर्ण प्रयोगातून चांगली कमाई करत आहेत.
मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातून देखील असाच एक प्रयोग समोर येत आहे. येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने दोन एकर सिताफळ बागेत कलिंगड आणि मिरचीची आंतरपीक म्हणून लागवड केली आहे.
यातील सिताफळ बागेतून तीन लाख रुपयांचे, कलिंगडच्या पिकातून पाच लाख रुपयांच उत्पन्न मिळवले आहे आणि आगामी काळात या शेतकऱ्याला मिरचीचे देखील चांगले उत्पन्न मिळणार आहे.
त्यामुळे हा आंतरपीक शेतीचा प्रयोग या शेतकऱ्यासाठी फायदेशीर ठरला असून सदर प्रयोगाची सध्या पंचक्रोशीत चर्चा पाहायला मिळत आहे. बाचोटी येथील प्रयोगशील शेतकरी अशोक भोसकर यांनी ही किमया साधली आहे.
याकामी त्यांच्या कुटुंबाने देखील त्यांना मोलाची मदत केली आहे. अशोक यांनी दिलेल्या माहितीनुसार, जून 2020 मध्ये त्यांनी दोन एकर जमिनीवर सीताफळाची लागवड केली.
8 बाय 14 या अंतरावर त्यांनी 800 सीताफळ रोपांची लागवड केली. यातून त्यांना तिसऱ्या वर्षापासून उत्पादन मिळत आहे.
पहिल्यांदा नोव्हेंबर-डिसेंबर 2023 मध्ये त्यांना सिताफळ बागेतून एक लाख तीस हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. यानंतर त्यांनी या बागेत कलिंगड लागवड केली. यामध्ये सव्वा फूट अंतर ठेवून त्यांनी मिरचीची देखील लागवड केली.
सिताफळ बागेत आंतरपीक म्हणून लावलेल्या कलिंगड पिकातून त्यांना चाळीस टन टरबूज उत्पादन मिळाले असून यातून त्यांना पाच लाख रुपयांची कमाई झाली आहे. विशेष म्हणजे सिताफळ बागेतून त्यांना तीन लाख रुपयांची कमाई झाली आहे.
तसेच मिरची पिकातून देखील येत्या काही दिवसात उत्पन्न मिळणार आहे. निश्चितच अशोक यांनी दोन एकरात अभिनव प्रयोग करून लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे.
त्यामुळे त्यांच्या या प्रयोगाची पंचक्रोशीत चर्चा होत असून अशोक यांनी शेतकऱ्यांना कमी कालावधीत तयार होणाऱ्या पिकांची शेती करण्याचा सल्ला यावेळी दिलेला आहे.