Farmer Success Story : राज्यातील शेतकऱ्यांनी अलीकडे पीक पद्धतीत मोठा बदल केला आहे. एकाच प्रकारचे पीक घेण्याऐवजी आता शेतकरी बांधव वेगवेगळ्या पिकांची शेती करत आहेत. यामुळे त्यांना चांगली कमाई देखील होत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातही एका प्रयोगशील शेतकऱ्याने असाच एक नवखा प्रयोग केला आहे. सांगलीतल्या शिराळा तालुक्यातील एका शेतकऱ्याने चक्क लाल कोबीची लागवड केली आहे.
शिराळा तालुक्यातील बिऊर येथील प्रयोगशील शेतकरी अभिजीत आकाराम पाटील यांनी ही किमया साधली आहे. खरंतर अभिजीत यांच्या गावातील अनेक प्रयोगशील शेतकरी भाजीपाला, गवती चहा तसेच वेगवेगळ्या व्यापारी पिकांची शेती करत असतात.
अभिजीत यांनी देखील पारंपारिक पिकांची लागवड करण्याऐवजी लाल कोबीची लागवड करण्याचा निर्णय घेतला. मुंबई, पुण्यात लाल कोबीला चांगली मागणी आहे. अभिजीत सांगतात की ग्रामीण भागात अजूनही लाल कोबीला मागणी नाहीये.
मात्र मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये लाल कोबी या विदेशी भाजीपाल्याला मोठी मागणी आहे. यामध्ये असणारे औषधी गुणधर्म पाहता याला चांगला भावही मिळतो. यामुळे त्यांनी त्यांच्याकडील 25 गुंठे जमिनीत लाल कोबीची लागवड केली आहे.
विशेष म्हणजे अभिजीत यांनी केलेला हा प्रयोग तालुक्यातील पहिला-वहिला प्रयोग आहे. यामुळे या प्रयोगाची सध्या पंचक्रोशीत मोठी चर्चा आहे. अभिजीत यांच्या या नवख्या प्रयोगाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
महत्त्वाचे म्हणजे त्यांनी लावलेल्या लाल कोबीचे पीक आता चांगले बहरले आहे. त्यातल्या त्यात साध्या कोबीपेक्षा म्हणजेच हिरव्या कोबीपेक्षा लाल कोबीला अधिक भाव मिळतो.
मोठ्या शहरांमधील शॉपिंग मॉल, मोठी भाजीपाला दुकाने, ऑनलाइन पोर्टलवर लाल कोबीला चांगली मागणी आहे. यामुळे जर या पिकाला बाजारात चांगला भाव मिळाला तर हेक्टरी सहा लाख रुपयांपर्यंतचे कमाई होऊ शकते असा विश्वास अभिजीत यांनी व्यक्त केला आहे.
हे पीक अवघ्या तीन महिन्यात काढणीसाठी तयार होते. जर या पिकाची योग्य पद्धतीने काळजी घेतली गेली तर अवघ्या 90 दिवसांच्या कालावधीत चांगली कमाई होऊ शकते.
यामुळे अभिजीत यांनी प्रायोगिक तत्त्वावर याची 25 गुंठ्यात लागवड केली आहे. जर या प्रायोगिक तत्त्वावर केलेल्या लागवडीतून त्यांना चांगली कमाई झाली तर पुढे अभिजीत लाल कोबीचे क्षेत्र वाढवणार आहेत.