Goat Rearing : देशात शेतीचा व्यवसाय फार पूर्वीपासून केला जात आहे. शेती सोबतच पशुपालन हा व्यवसाय देखील फार पूर्वीपासून सुरू आहे. जर शेतकऱ्यांनी शेती सोबतच पशुपालन व्यवसाय केला तर त्यांच्या उत्पन्नात भर पडते. पशुपालन व्यवसायात गाय, म्हैस, शेळी यांसारख्या जनावरांचे संगोपन केले जाते. मात्र अल्पभूधारक शेतकऱ्यांना गाय आणि म्हैस पालन करणे थोडे अवघड होऊन जाते.
यामुळे अशा शेतकऱ्यांनी अधिकच्या उत्पन्नासाठी शेळी पालन व्यवसाय केला पाहिजे असा सल्ला दिला जातो. शेळीला गरिबांची गाय म्हणून ओळखतात. शेळीपालन करण्यासाठी लागणारा खर्च हा खूपच कमी असतो. शिवाय शेळीपालनासाठी कमी जागा लागते.
शेळीला लागणाऱ्या चाऱ्यासाठी देखील कमी खर्च करावा लागतो. यामुळे शेळीपालन व्यवसायातून कमी खर्चात अधिकचे उत्पन्न मिळवता येऊ शकते. मात्र असे असले तरी या व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी शेळीच्या सुधारित जातींचे संगोपन करावे लागते. जर शेतकऱ्यांनी सुधारित जातीचे पालन केले तर त्यांना लाखो रुपयांची कमाई होऊ शकते.
तज्ञ लोक सांगतात की, सुधारित जातींच्या 20 शेळ्यांचे संगोपन केले तर वर्षाकाठी अडीच लाखांपर्यंतची कमाई होऊ शकते. अशा परिस्थितीत आता आपण शेळीच्या काही सुधारित जातीची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
गुजरी शेळी : शेळीची एक देशी जात असून राजस्थानमध्ये या जातीचे मोठ्या प्रमाणात संगोपन होते. या जातीची शेळी प्रामुख्याने अलवरमध्ये आढळते. या भागात या जातीचे मोठ्या प्रमाणात संगोपन केले जात आहे. अलीकडे आपल्या महाराष्ट्रातही शेळीची ही जात मोठ्या प्रमाणात पाळली जात आहे. या जातीपासून राज्यातील शेतकऱ्यांना चांगली कमाई देखील होत आहे. ही जात सरासरी १.६० लिटरपर्यंत दूध देत असल्याचा दावा केला जातोय.
या शेळीचा रंग पांढरा आणि तपकिरी असतो आणि त्यांच्या तोंडावर, पायांवर आणि पोटावर पांढरे डाग पाहायला मिळतात. या शेळीचे वजन 58 किलो आणि बोकडचे वजन सरासरी 69 किलो एवढे असते. आपल्या राज्यात देखील या जातीचे मोठ्या प्रमाणात संगोपन होते. आपल्याकडे या जातीच्या शेळ्यांना विशेष आहार दिला जातो ज्यामुळे या शेळ्यांचे वजन 150 किलोपेक्षा जास्त भरते. यामुळे या जातींच्या शेळीचे संगोपन आपल्या राज्यातील पशुपालकांना चांगला लाभ मिळवून देत आहे.
सोजत : गुजरी शेळीप्रमाणेच या जातीच्या शेळीचे पालन देखील राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात केले जात आहे. राजस्थान मधील पाली, जैसलमेर, जोधपूर आणि नागोर या परिसरात ही जात प्रामुख्याने पाहायला मिळते. राजस्थान मधील इतर भागातही या जातीचे संगोपन केले जाते.
आपल्या राज्यातील काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी देखील या जातीच्या शेळीचे संगोपन सुरु केले आहे. या शेळीचे वजन 40 ते 50 किलो दरम्यान असते. तर बोकड हे 50 ते 60 किलो वजनाचे तयार होत असते. ही शेळी दररोज 1 ते 1.5 लिटर दूध देण्यास सक्षम असल्याचा दावा केला जातो. या जातीच्या शेळीचे संगोपन पशुपालकांसाठी फायदेशीर ठरत आहे.
उस्मानाबादी : महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात ही जात प्रामुख्याने आढळते. हेच कारण आहे की या जातीला उस्मानाबादी या नावाने संबोधले जात आहे. ही शेळीची एक देशी जात असून राज्यातील विविध भागांमध्ये या जातीच्या शेळीचे संगोपन केले जात आहे. ही शेळी आकाराने सामान्य शेळ्यांपेक्षा मोठी असते. या जातीच्या शेळीचा रंग काळा आणि पांढरा असतो. या शेळीच्या अंगावर तपकिरी रंगाचे ठिपके असतात.
यावरूनच शेळीची ही जात ओळखली जाते. ही शेळी दररोज ०.५ लिटर दूध देते. पण या शेळीचे वजन 32 किलो आणि बोकडचे वजन 34 किलो पर्यंत असते. या शेळीची दूध उत्पादन क्षमता कमी आहे म्हणून या शेळीचे पालन मांसासाठी केले जाते. राज्यातील हवामान या शेळीला विशेष मानवत असल्याने पशुपालक शेतकऱ्यांसाठी या जातींचे पालन फायदेशीर ठरू शकते.