Maharashtra Railway : रेल्वे हे प्रवासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. देशातील जवळपास निम्म्याहून अधिक जनसंख्या प्रवासासाठी रेल्वेचा वापर करते. आपल्या देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या ही निश्चितच अधिक आहे.
विशेष म्हणजे भारतीय रेल्वे प्रवाशांचा प्रवास आरामदायी आणि सुरक्षित व्हावा यासाठी विशेष प्रयत्न देखील करत आहे. याचं प्रयत्नाचा एक भाग म्हणून वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील सर्वाधिक वेगवान हाय स्पीड ट्रेन सुरू करण्यात आली आहे.
ही गाडी सर्वप्रथम 2019 मध्ये सुरू झाली होती. यानंतर मग टप्प्याटप्प्याने ही गाडी सुरू करण्यात आली. आतापर्यंत देशातील 34 महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू झाले आहे. विशेष म्हणजे येत्या काही महिन्यांमध्ये ही संख्या आणखी वाढणार आहे.
केंद्र शासनाच्या माध्यमातून आगामी लोकसभेच्या आणि राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या गाडीची संख्या वाढवली जाणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 30 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देशाला सहा नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट दिली जाणार आहे.
विशेष म्हणजे या दिवशी महाराष्ट्राला देखील एका वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. यामुळे राज्यातील रेल्वे प्रवाशांना देखील दिलासा मिळणार असल्याचे चित्र आहे. दरम्यान आता आपण पंतप्रधान महोदय कोणत्या सहा मार्गांवरील वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
या वंदे भारत एक्सप्रेसला दाखवणार हिरवा झेंडा
मिळालेल्या माहितीनुसार, नवी दिल्ली ते आयोध्या, नवी दिल्ली ते दरभंगा या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली जाणार आहे. विशेष म्हणजे या दोन्ही गाड्या लखनऊ मार्गे धावणार आहेत. याशिवाय अमृतसर ते दिल्ली, वैष्णोदेवी ते दिल्ली, कोइंबतूर ते बेंगलोर या मार्गावर देखील वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली जाणार आहे.
विशेष बाब म्हणजे या पाच मार्गाव्यतिरिक्त जालना ते मुंबई या महत्त्वाच्या मार्गावर देखील वंदे भारत ट्रेन चालवण्याचा निर्णय रेल्वेच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. मुंबई ते जालना वंदे भारत एक्सप्रेस छत्रपती संभाजीनगर व्हाया चालवली जाणार आहे. त्यामुळे या गाडीचा छत्रपती संभाजी नगर, जालना सह संपूर्ण मराठवाड्यातील नागरिकांना फायदा मिळणारा असा आशावाद व्यक्त होऊ लागला आहे.