Government Employee DA Hike : येत्या आठ ते नऊ दिवसात नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. नवीन वर्षात अनेक जण नवीन संकल्प घेऊन पुढे वाटचाल करणार आहेत.
दरम्यान या नवीन वर्षाच्या पूर्वीचं सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. ही बातमी पश्चिम बंगालमधील राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची आहे.
कारण की, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्के एवढा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ही महागाई भत्ता वाढ जानेवारी 2024 पासून लागू होणार आहे. याबाबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मी जाहीर करते की राज्य सरकारचे सर्व 14 लाख कर्मचारी, सर्व शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, सर्व सरकारी उपक्रमांचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 1 जानेवारी 2024 पासून चार टक्के डीएवाढ दिली जाईल.
दरम्यान यासाठी पश्चिम बंगाल राज्य शासनाच्या तिजोरीवर 2400 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.
मुख्यमंत्री महोदया म्हटल्या की, आमच्यासाठी डीए वाढ लागू करणे बंधनकारक नाही तर ऑप्शनल आहे. मात्र कर्मचाऱ्यांचे हित लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.
पश्चिम बंगाल व्यतिरिक्त मेघालय येथील राज्य शासनाने देखील ख्रिसमस अर्थातच नाताळ सणाच्या पूर्वीच तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
यासोबतच मेघालय येथील राज्य कर्मचाऱ्यांना डिसेंबर महिन्याचे वेतन देखील वेळेआधी दिले जाणार आहे. नाताळ सणासाठी कर्मचाऱ्यांना पैशांची गरज भासू शकते आणि यामुळेच तेथील राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान नवीन वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना देखील मोठी भेट मिळणार असा दावा केला जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी 2024 पासून पाच टक्क्यांनी वाढवणार आहे.
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46% एवढा आहे, पण आता त्यामध्ये पाच टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा महागाई भत्ता 51 टक्क्यांवर जाणार असा आशावाद व्यक्त होत आहे.