Government Employee News : लोकसभा निवडणुकीसाठी आता अवघ्या काही दिवसांचा काळ बाकी आहे. भारतीय निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा करू शकते. अशा परिस्थितीत, सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी राज्यातील शिंदे सरकारने नुकतेच काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
काल अर्थातच 13 मार्च 2024 रोजी शिंदे सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली आहे. या बैठकीचे अध्यक्ष स्थान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे होते.
या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची सुद्धा हजेरी होती. शिवाय इतरही अन्य मंत्री lगण या बैठकीत उपस्थित होते.
दरम्यान कालच्या या बैठकीत शिंदे-फडणवीस-पवार सरकारने राज्यातील काही कर्मचाऱ्यांचे पगार वाढवण्याचे जाहीर केले आहे. राज्यातील काही कर्मचाऱ्यांचे पगार पाच हजार रुपयांपासून ते 8,500 पर्यंत वाढवण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.
यामुळे सदर कर्मचाऱ्यांना होळी सणाच्या आधीच मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. आता आपण राज्य सरकारने कोणत्या कर्मचाऱ्यांचे पगार कितीने वाढवले आहेत हे थोडक्यात जाणून घेणार आहोत.
आशा स्वयंसेविकाचा पगार 5000 ने वाढला
कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आशा स्वयंसेविकाचा पगार 5000 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे याचा लाभ नोव्हेंबर 2023 पासून लागू करण्यात आला आहे.
यामुळे सदर कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर 2023 पासूनची पगारातील फरकाची रक्कमही मिळणार आहे. यामुळे राज्य शासनावर 961.08 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलीस पाटलांचे मानधनही वाढले
पोलीस पाटील पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे देखील मानधन वाढवण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांचे पगार 8500 रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. यानुसार पोलीस पाटील यांना आता पंधरा हजार रुपये प्रति महिना एवढे मानधन मिळणार आहे. राज्यातील 38,725 पोलीस पाटील यांना या वाढीव मानधनाचा लाभ मिळणार आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पगार वाढलेत
महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील वैद्यकीय तसेच दंत व आयुर्वेद महाविद्यालयामधील प्राध्यापकांचे देखील पगार वाढवले गेले आहेत. या निर्णयानुसार आता सदर महाविद्यालयात कार्यरत असलेल्या प्राध्यापकांना तीस हजार रुपये प्रति महिना आणि असिस्टंट प्राध्यापकांना 25 हजार रुपये प्रति महिना एवढे मानधन मिळणार आहे. त्यामुळे या सदर प्राध्यापकांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे.