Government Scheme : येत्या दोन दिवसात महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात दिवाळीला सुरुवात होणार आहे. पण वाढत्या महागाईमुळे दिवाळी सण उंबरठ्यावर येऊन ठेपला असतानाही नागरिकांमध्ये प्रसन्न वातावरण पाहायला मिळत नाहीये. सणासुदीच्या काळात वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता बेजार झाली असल्याचे चित्र तयार झाले आहे.
सर्वसामान्य नागरिक महागाईच्या मुद्द्यावर सरकार विरोधात एकवटू लागले आहेत. नागरिकांमध्ये शासनाच्या विरोधात नाराजी वाढत आहे. जाणकार लोकांनी देखील महागाईचा मुद्दा आगामी निवडणुकांमध्ये सरकारसाठी त्रासदायक ठरणार असल्याचे नमूद केले आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये तसेच या चालू वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकित महागाईचा मुद्दा चांगलाच गाजण्याची शक्यता आहे.
या मुद्द्यावर सरकार पडूही शकते आणि याच मुद्द्यावर सरकार घडूही शकते हे आता राजकर्त्यांना कळून चुकले आहे. यामुळे केंद्रातील मोदी सरकार आता महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करू लागली आहे.
याच मालिकेत नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने गॅस सिलेंडरच्या किमती 200 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या गॅस सिलेंडरच्या अनुदानात शंभर रुपयांची वाढ देखील केली आहे.
दरम्यान दिवाळी सणाच्या काळात आता सर्वसामान्यांना स्वस्तात गव्हाचे पीठ उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्रातील मोदी सरकार भारत ब्रँड अंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना स्वस्त दरात गव्हाचे पीठ उपलब्ध करून देणार आहे.
या भारत ब्रँड अंतर्गत सर्वसामान्यांना फक्त 27 रुपये आणि 50 पैसे प्रति किलो या दरात गव्हाचे पीठ उपलब्ध मिळणार आहे. विशेष म्हणजे या निर्णयाची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे.
केंद्रीय ग्राहक मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते दिल्लीत भारत ब्रँड आटा लॉन्च करण्यात आला आहे. आता देशभरातील नागरिकांना 27 रुपये आणि 50 पैसे प्रति किलो या दरात गव्हाचे पीठ मिळणार आहे.
भारत ब्रँड अंतर्गत उपलब्ध होणारे हे गव्हाचे पीठ 10 किलो आणि 30 किलोच्या बॅगमध्ये मिळणार आहे. खरंतर, सध्या 40 ते 45 रुपये प्रति किलो या दरात गव्हाचे पीठ बाजारात उपलब्ध होत आहे. मात्र सर्वसामान्यांना भारत ब्रँडचे गव्हाचे पीठ फक्त 27.50 रुपये प्रति किलो या दरात उपलब्ध होणार आहे.
या पिठाची विक्री आता मदर डेरी, नाफेड, एनसीसीएफ यांसारख्या संस्थेच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे.