Havaman Andaj : गेल्या वर्षाचा शेवट अवकाळी पाऊसाने झाला आहे. गेल्यावर्षी अर्थातच 2023 मध्ये मान्सून काळात पुरेसा पाऊस झाला नाही. महाराष्ट्रात मान्सून काळात सरासरीच्या तुलनेत 12 टक्के कमी पावसाची नोंद करण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
दुसरीकडे, मान्सून आटोपल्यानंतर राज्यावर अवकाळी पावसाचे संकट आले. नोव्हेंबर आणि डिसेंबर 2023 मध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस बरसला.
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान केले. नवीन वर्षाची सुरुवात देखील अवकाळी पावसाने झाली. नोव्हेंबर महिन्यात जेवढी अवकाळी पावसाची तीव्रता होती तेवढी नवीन वर्षात पाहायला मिळाली नाही.
मात्र असे असले तरी अवकाळी पावसामुळे आणि ढगाळ हवामानामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झालेच आहे. पण आता गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात बदल झाला आहे.
महाराष्ट्रातील हवामान पुन्हा एकदा पूर्व पदावर आले असून आणि अवकाळी पावसाचे सावट टळले आहे. राज्यातील अनेक भागात आता थंडीचा जोर वाढत आहे.
अशातच मात्र नागपुर येथील प्रादेशिक हवामान केंद्राने पुन्हा एकदा महाराष्ट्रातील हवामानात बदल होणार आणि पुन्हा राज्यात अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज दिला आहे.
प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, 20 जानेवारी ते 22 जानेवारी दरम्यान विदर्भातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे.
मात्र त्यानंतर हवामानात मोठा बदल येईल आणि विदर्भात अवकाळी पाऊस बरसेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 23 जानेवारीला पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे.
कर्नाटक ते पूर्व विदर्भात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये 23 जानेवारीला तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सऱ्या बरसतील असा अंदाज आहे.
यामुळे पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडणार आहे. दरम्यान पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.