Havaman Andaj :- यावर्षी जर आपण संपूर्ण महाराष्ट्राचा पावसाचा विचार केला तर सुरुवात निराशाजनक झाली.परंतु जून महिन्यानंतर जुलैत मात्र महाराष्ट्रात सर्वदूर चांगल्या प्रकारे पाऊस झाला व खरिपाची पिके वाचली. परंतु हा पडलेला पाऊस तितकासा पुरेसा न होता.
त्यामुळे जोरदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना होती. त्यानंतर ऑगस्ट महिना तर कोरडाच गेला व त्यानंतर सप्टेंबर महिन्याची सुरुवात बऱ्यापैकी झाली. परंतु सध्या राज्यामध्ये कमी जास्त प्रमाणात पाऊस पडत आहे. परंतु हवा तेवढा पाऊस अजून देखील महाराष्ट्रात नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवर माणिकराव खुळे, ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ञ भारतीय हवामान खाते पुणे यांनी वर्तवलेला येणाऱ्या काही दिवसांचा हवामान अंदाज आपण पाहणार आहोत.
महाराष्ट्रात पावसाची तीव्रता कमी होणार ?
सध्या जर आपण मान्सूनची स्थिती पाहिली तर सध्या कमी दाबक क्षेत्र प्रणाली ही पूर्व मध्य प्रदेशातून गुजरात राज्याकडे उतरण्याची शक्यता असल्यामुळे सध्या मध्यप्रदेश मध्ये खूप जोरदार पाऊस होत आहे.
या ठिकाणी अनेक नद्यांना मोठ्या प्रमाणावर पूर आला असून अनेक नद्यांनी धोक्याची पातळी पार केलेली आहे. त्यामुळे मध्यप्रदेश नंतर येणाऱ्या दोन दिवसांमध्ये गुजरात राज्यात देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे. याच सगळ्या वातावरणीय प्रणालीमुळे 16 ते 19 सप्टेंबर दरम्यानच्या चार दिवसात महाराष्ट्रात मध्यम आणि जोरदार पावसाची जी काही अपेक्षा होती व त्याची तीव्रता कमी झालेली दिसून येत आहे.
आपण या कालावधीचा विचार केला तर महाराष्ट्रातील केवळ खानदेश तसेच पालघर, अमरावती, कोल्हापूर आणि बुलढाणा इत्यादी ठिकाणी समाधानकारक परिस्थिती राहिली. त्याशिवाय या जिल्ह्यांमध्येच आणि मुंबई सह उत्तर कोकणामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे.
त्या व्यतिरिक्त मात्र नाशिक, अहमदनगर तसेच पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली नांदेड व तसेच विदर्भातील काही जिल्ह्यात 23 सप्टेंबर पर्यंत तुरळक ठिकाणीच किरकोळ पाऊस पडेल अशी शक्यता सध्या दिसून येत आहे. तसेच दक्षिण महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर तसेच धाराशिव व लातूर जिल्ह्यामध्ये पुढील सात दिवसात म्हणजेच 23 सप्टेंबर पर्यंत पावसाची शक्यता फारच कमी आहे.