Havaman Andaj : महाराष्ट्रासह देशातील विविध भागात हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा जोर वाढला आहे तर दक्षिणेकडील राज्यात अजूनही मुसळधार पाऊस बरसत आहे. देशात सध्या संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे.
काल 19 डिसेंबर 2023 रोजी दक्षिण तामिळनाडूमध्ये अति मुसळधार पाऊस बरसला आहे. यामुळे तामिळनाडूमध्ये सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
याशिवाय तामिळनाडूमधील शेती पिकांवर देखील या पावसाचा विपरीत परिणाम पाहायला मिळत आहे. खरं तर आपल्या महाराष्ट्रात देखील गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि या चालू महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती.
गेल्या महिन्यात तर काही ठिकाणी गारपीट देखील झाली. यामुळे राज्यातील बहुतांशी भागातील शेती पिकांवर विपरीत परिणाम झाला आहे. प्रामुख्याने रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिकांवर याचा परिणाम झाला असून पिकांवर आता विविध रोगांचे सावट पाहायला मिळत आहे.
विशेष म्हणजे आज देखील देशाच्या काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एवढेच नाही तर पुढील सात दिवस देशातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरूच राहणार असा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज अर्थातच 20 डिसेंबर 2023 रोजी कन्याकुमारी, तिरुनेलवेली, थूथुकुडी आणि तेनकासी या जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे.
यामुळे या संबंधित भागातील सर्वसामान्य नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सध्या तामिळनाडू मध्ये अतिमुसळधार पाऊस सुरु आहे, तसेच आगामी सात दिवस येथे मुसळधार पाऊस सुरूच राहणार आहे.
सोबतच देशातील पुदुच्चेरी, कराईकल, केरळ, आदंमान आणि निकोबारमध्येही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावणार असे आयएमडीने आपल्या नवीन बुलेटिनमध्ये स्पष्ट केले आहे. याशिवाय देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा जोर वाढणार असा अंदाज आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील आता गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी पडत आहे.
राज्यातील पावसाळी वातावरण आता पूर्णपणे निवळले आहे. उत्तरेकडील काही राज्यांमध्ये थंडीची लाट आली असल्याने आणि काही राज्यांमध्ये बर्फवृष्टी होत असल्याने आपल्या महाराष्ट्रातही गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. राज्यातील कमाल आणि किमान तापमान मोठ्या प्रमाणात घटले आहे.
यामुळे दिवसादेखील थंडी वाजत आहे. दिवसा सुद्धा स्वेटर परिधान करावे लागत आहे. विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्रात आगामी काही दिवस हवामान कोरडे राहील आणि थंडीचा जोर असाच वाढत राहील असा अंदाज देण्यात आला आहे.