Havaman Andaj September : राज्यात ऑगस्ट महिन्यात पावसाने खंड घेतल्यानंतर सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. मान्सूनसाठी पोषक परिस्थिती तयार झाली असल्याने राज्यात पुन्हा एकदा मौसमी पाऊसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान राज्यात सात सप्टेंबरपासून ते 10 सप्टेंबरच्या काळात मुसळधार पाऊस पडला. राज्यातील विदर्भ मराठवाडा कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी भागात या कालावधीत चांगल्या पावसाची हजेरी पाहायला मिळाली. मात्र तदनंतर राज्यातून पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे.
बैलपोळ्याच्या दिवशी म्हणजेच 14 सप्टेंबरला राज्यातील काही भागात जरूर पाऊस पडला मात्र पावसाचा जोर हा कमीच होता. याशिवाय गणरायाच्या आगमनाच्या दिवशी अर्थातच गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच 19 सप्टेंबरला देखील राज्यातील काही भागांमध्ये पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
मात्र असे असले तरी अद्याप ऑगस्ट महिन्यातील पावसाची तूट भरून निघेल असा जोरदार पाऊस काही झालेला नाही. यामुळे मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाच्या नजरा आता आभाळाकडे आहेत. मान्सूनच्या शिल्लक राहिलेल्या दिवसांमध्ये जर चांगला मोठा पाऊस बरसला तरच महाराष्ट्रावरील दुष्काळाचे संकट कमी होईल असे सांगितले जात आहे.
जर आगामी काळात चांगला मोठा पाऊस पडला नाही तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील ऐरणीवर येण्याची शक्यता जाणकारांनी वर्तवली आहे. अशातच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असल्याने याचा परिणाम म्हणून राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार होत असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे.
आज देखील राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज राज्यातील तब्बल 20 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडू शकतो असा अंदाज आयएमडीने नुकताच वर्तवला आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील 20 जिल्ह्यात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील उर्वरित भागात देखील विजांसह हलका पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आज अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार असा अंदाज असून या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
याशिवाय आज नाशिक, नगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यात देखील विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांना सुद्धा येलो अलर्ट देण्यात आला आहे.