Havaman Andaj : जून महिन्यात पावसाचा मोठा लपंडाव पाहायला मिळाला. मात्र हवामान खात्याने जुलै महिन्यात राज्यातील जवळपास 30 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार असा अंदाज दिला. तसेच उर्वरित सहा जिल्ह्यांमध्येही सरासरी एवढा पाऊस राहणार असे हवामान खात्याने स्पष्ट केले. मात्र हवामान खात्याच्या अंदाजानुसार अद्याप तरी महाराष्ट्रात अशा जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला नाही.
अजूनही राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे हे विशेष. जुलै महिन्याचा पहिला आठवडा राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने ओढ दिली होती. असे म्हणण्यापेक्षा या काळात संपूर्ण महाराष्ट्रातच पावसाचा खंड राहिला.
मात्र जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यात पावसाला सुरुवात झाली. कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा परिसर आणि विदर्भात काही ठिकाणी चांगला जोरदार पाऊस झाला. पण आजही असे अनेक जिल्हे आहेत जे की मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेतचं आहेत.
अशातच आता भारतीय हवामान खात्याने आज आणि उद्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस बरसणार आहे असे म्हटले आहे. विशेष म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
हवामान खात्याने आपल्या नवीन हवामान अंदाजात आज विदर्भातील पूर्वेकडील जिल्ह्यांमध्ये, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा परिसरावर आणि कोकणात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या अनुषंगाने या भागातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट मिळाला आहे.
तसेच विदर्भातील पश्चिमेकडील जिल्ह्यांमध्ये, मराठवाडा विभागातील नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात मात्र ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असे आयएमडीने यावेळी स्पष्ट केले.
याशिवाय, उद्या भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या विदर्भातील चार जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
याशिवाय दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा जिल्हा विशेषता जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरावर उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अनुषंगाने या संबंधित सहा जिल्ह्यांना उद्यासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे.
याशिवाय मुंबईसह उर्वरित कोकणाला ऑरेंज अलर्ट मिळाला आहे. विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर आणि मध्य महाराष्ट्रातील पुण्याला देखील उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
उद्या उर्वरित विदर्भ, मराठवाडा विभागातील नांदेड, जालना, परभणी, हिंगोली आणि मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, कोल्हापूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्याच्या उर्वरित भागात मात्र उद्या हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.