Havaman Andaj : आज पासून नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. नवीन वर्षाचा आज पहिलाच दिवस आहे. मात्र नववर्षाच्या या पहिल्याच दिवशी देशातील हवामानात पुन्हा मोठा बदल पाहायला मिळत आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमधील गारठा कमी झाला आहे. आपल्या राज्यातही किमान तापमानात वाढ होत असल्याने थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. काही राज्यात ढगाळ हवामान देखील पाहायला मिळत आहे. दरम्यान आजपासून आगामी काही दिवस महाराष्ट्रासह देशातील पाच राज्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची तीव्रता आगामी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. सध्या उत्तर भारतात अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी पडत आहे. विशेष म्हणजे पुढील काही दिवस थंडीची ही तीव्रता अशीच कायम राहणार असल्याने तेथील रब्बी हंगामातील पिकांना याचा मोठा फायदा मिळणार आहे.
तथापि देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये आगामी काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने जर हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला आणि दक्षिण भागातील राज्यांमध्ये पुन्हा मुसळधार पाऊस बरसला तर तेथील शेती पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते असे सांगितले जात आहे.आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे आज 1 जानेवारी आणि उद्या 2 जानेवारी 2024 रोजी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तामिळनाडू आणि केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. परिणामी तेथील शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकांची काळजी घेण्याचे आवाहन यावेळी जाणकारांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात कसे राहणार हवामान ?
महाराष्ट्राचा विचार केला असता राज्यातही आगामी काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता तयार होत आहे. राज्यात एक जानेवारी ते सात जानेवारी 2024 दरम्यान मध्य महाराष्ट्र कोकण आणि विदर्भात अवकाळी पाऊस हजेरी लावणार असा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील आणि कोकणातील 17 जिल्ह्यांमध्ये तसेच विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे तर या संबंधित विभागातील बहुतांशी ठिकाणी ढगाळ हवामानाची शक्यता आहे.
या कालावधीत मराठवाड्यातील हवामान मात्र प्रामुख्याने कोरडे राहणार असा अंदाज आहे. दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता असल्याने तेथील शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. पावसाळी वातावरणामुळे रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिकांवर विपरीत परिणाम होऊ शकतो असा अंदाज कृषी तज्ञांनी व्यक्त केला आहे.