Panjabrao Dakh News : या चालू जुलै महिन्यात महाराष्ट्राला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. जोरदार पावसामुळे महाराष्ट्रातील खरीप हंगामातील बहुतांश विभागातील पिकांना नवीन जीवदान मिळाले आहे. मात्र काही भागात अतिवृष्टी झाली असल्याने तेथे पूरस्थिती निर्माण झाली असून तेथील शेती पिकांना याचा मोठा फटका बसत आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यात सरासरीच्या तुलनेत 17 टक्के अधिक पाऊस पडला आहे. विशेष बाब म्हणजे एक जून ते 27 जुलै या कालावधीत सरासरीच्या तुलनेत 13 टक्के अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे.अर्थातच जून महिन्यात पावसाची जी तूट होती ती जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे भरून निघाली आहे.
अशातच मात्र हवामान विभागाच्या माध्यमातून थोडीशी चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे ऑगस्ट महिन्यातील सुरुवातीचे दोन आठवडे राज्यात अपेक्षित असा पाऊस होणार नसल्याचे सांगितले जात आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यातील सुरुवातीचे दहा दिवस राज्यात हवामान कोरडे राहणार आहे.
या काळात राज्यात कुठेच जोरदार पाऊस पडणार नाही असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे कोकण किनारपट्टीवर देखील हलक्या सऱ्या बरसतील पण जोरदार पाऊस होणार नाही असं हवामान विभागाने सांगितल आहे.आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार, आज आणि उद्या अर्थातच 30 आणि 31 जुलै रोजी राज्यातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. यानंतर पाऊसविश्रांती घेणार असा अंदाज आहे.
ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी देखील आज आणि उद्या राज्यातील मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. पंजाबरावांच्या मते, आज आणि उद्या अर्थातच 31 जुलैपर्यंत यवतमाळ, हिंगोली, वाशीम, परभणी, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, अमरावती, बुलढाणा, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, सोलापूर, अ.नगर जिल्ह्यातील काही भागात, बीड आणि छ.संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या नमूद केलेल्या जिल्ह्यांमध्ये सर्व दूर पाऊस होणार नाही. मात्र भाग बदलत का होईना पाऊस पडेल असा अंदाज आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी पंजाबरावांनी जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये आणि सप्टेंबरमध्ये अधिक पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे ऑगस्टमध्ये खरंच चांगला पाऊस पडतो की हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे पावसाचा खंड राहतो हे आता पाहण्यासारखे राहणार आहे.