Maharashtra Rain : गेल्या महिन्यात वादळी पावसाने तडाखा दिल्यानंतर आता मे महिनाही वादळी पाऊस चांगलाच गाजवणार असे चित्र तयार होत आहे. राज्यातील हवामानात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने बदल होत असून सध्या स्थितीला राज्यात मिश्र हवामान पाहायला मिळत आहे.
एकीकडे राज्यातील काही भागांमध्ये तापमान तब्बल 42 ते 43 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे तर काही ठिकाणी पूर्व मोसमी पावसाची तुफान बॅटिंग सुरु आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये ढगाळ हवामान आणि वादळी पाऊस सुरु आहे.
विशेष म्हणजे विदर्भ विभागातील काही भागांमध्ये गारपीट झाल्याची नोंदही करण्यात आली आहे. त्यामुळे मात्र शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून अखेरकार हा वादळी पाऊस केव्हा थांबणार,
आणखी किती दिवस पूर्व मौसमी वादळी पावसाच्या सऱ्या बरसणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. दरम्यान याच संदर्भात जास्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी मोठी माहिती दिली आहे. माणिकराव खुळे यांनी महाराष्ट्रात आणखी किती दिवस पावसाची शक्यता आहे याबाबत महत्वाची अपडेट दिली आहे.
राज्यात आणखी किती दिवस बरसणार पूर्व मौसमी पाऊस?
भारतीय हवामान खात्याने आज राज्यातील तब्बल 19 जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवली. आयएमडीने आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवली असून विदर्भ विभागातील काही भागांमध्ये गारपीट होणार असाही अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून समोर आला आहे.
याशिवाय ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी सुद्धा वादळी पावसा संदर्भात महत्त्वाची अपडेट दिली आहे. खुळे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात 16 मे पर्यंत ढगाळ वातावरण अन तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता जाणवत असल्याचे म्हटले आहे.
त्यांनी मध्य महाराष्ट्र विभागातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि मराठवाडा विभागातील उस्मानाबाद आणि लातूर अशा एकूण 5 जिल्ह्यात मध्यम अवकाळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता वर्तवली आहे. यासंदर्भात पुढे बोलताना त्यांनी असे म्हटले आहे की, महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या व पाचव्या टप्प्यातील मतदानादरम्यान उष्णतेची लाट अजिबात जाणवणार नाही.